दिंडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा रंगला रिंगण सोहळा
अहमदनगर (प्रतिनिधी)- विठ्ठल विठ्ठल…विठ्ठला हरी ओम विठ्ठला…, ज्ञानबा तुकाराम…, विठ्ठल माझा माझा… मी विठ्ठलाचा… ,माऊली…माऊली… या भक्तीगीतांमध्ये तल्लीन होऊन विठ्ठल नामाच्या जय घोषात, श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सावेडी उपनगरातून दिंडी काढली. टाळ-मृदंगाच्या गजरात, लेझिम व ढोल पथकासह विविध वेशभुषा परिधान केलेल्या या बालवारकर्यांनी पर्यावरणातील हिरवाईने फुललेल्या विठ्ठलाचे दर्शन घडवून झाडे लावा… झाडे जगवाची घोषणा देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
आषाढी एकादशी निमित्त काढण्यात आलेल्या दिंडीत विद्यार्थी वारकरींच्या वेशभूषेत तर विद्यार्थिनी डोक्यावर तुलस घेऊन सहभागी झाल्या होत्या. भगवे ध्वज, टाळ, मृदूंग व वीणा हातात घेऊन बाल वारकर्यांनी केलेल्या विठ्ठल नामाच्या गजराने संपुर्ण परिसर दुमदुमून गेला. विठ्ठल-रुक्मणी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी, श्रीकृष्ण, मीराबाई, मुक्ताबाई व संत तुकारामांच्या वेशभूषा परिधान केलेले लहान विद्यार्थी दिंडीचे आकर्षण ठरले.
विद्यार्थ्यांनी लेझिमचे डाव सादर केले. दिंडीमध्ये रोप घेऊन सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी वृक्षरोपण व संवर्धनाचा व पर्यावरणातच विठ्ठल असल्याचा संदेश दिला. श्रमिकनगरच्या बालाजी मंदिर समोर विद्यार्थ्यांनी केलेल्या रिंगण सोहळ्यांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यावेळी विद्यार्थिनी व शिक्षिकांनी फुगड्यांचा फेर धरला होता.
पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. रत्ना बल्लाळ, विश्वस्त राजेंद्र म्याना, स्मिता म्याना, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका विद्या दगडे, माध्यमिकचे मुख्याध्यापक शशीकांत गोरे यांच्या हस्ते पालखीच्या पूजनाने दिंडीस प्रारंभ करण्यात आले.
या दिंडीत सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक देखील सहभागी झाले होते. दिंडीतील पालखीचे चौका-चौकात स्वागत करण्यात आले. लहान मुलांची दिंडी पहाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भिस्तबाग चौक, वैदूवाडी येथून मार्गक्रमण करत शाळेच्या आवारात दिंडीचा समारोप झाला.