विद्यार्थ्याला धर्मावरुन दिलेल्या चुकीच्या वागणुकीचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे
असे प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी सर्वच शाळांना सूचना करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा शीख, पंजाबी समाजाच्या वतीने राहुरी येथील शीख समाजातील शालेय विद्यार्थ्याला धर्मावरुन दिलेला व चुकीच्या वागणुकीचा निषेध नोंदविण्यात आला. तर समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून असे प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी सर्वच शाळांना सूचना करण्याची मागणी केली. यावेळी हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, अजय पंजाबी, पुनित भूतानी, अर्जुन मदान, बॉबीसिंग बाजवा, जस्मितसिंह वधवा, दलजितसिंह वधवा आदी उपस्थित होते.
राहुरी येथील एका शाळेत इयत्ता नऊवीत शिकणार्या शीख समाजाच्या विद्यार्थ्याला उपप्राचार्याने केस कापून पगडी न ठेवण्यासंदर्भात टार्गेट केले. याप्रकरणी सदर विद्यार्थी आणि कुटुंबातील व्यक्तींनी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे. यामध्ये गुन्हा दाखल होऊन त्या उपप्राचार्याला पोलीसांनी अटक देखील केली आहे. या प्रकरणातून जातीय तेढ निर्माण होऊ नये, यासाठी हे प्रकरण तात्काळ फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून सदर कुटुंबीयांना न्याय देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शीख, पंजाबी समाजात पुरुष डोक्यावरील केस कापत नाही, तर पगडी घालतात. स्वत:जवळ किर्पाण बाळगून, हातात कडा परिधान करत असतात. यापूर्वी देखील अनेक शाळेत विद्यार्थी हातात घालत असलेला कडा व डोक्यावरील पगडीवरुन वाद झालेले आहेत. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी शीख, पंजाबी समाज बांधव राहतात, त्या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना धर्माचे आचरण करण्यास अडचणी निर्माण होतात. यासाठी सर्व शालेय प्रशासनाला शीख, पंजाबी धर्म आचरणाचा भाग असलेले केस, पगडी, किर्पाण व कडा याबद्दल विद्यार्थ्यांना मुभा देण्याचे फलक शाळेत लावण्याची मागणी देखील समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

