• Thu. Jan 29th, 2026

शहरासह ग्रामीण भागात नागरिकांची कॅन्सर तपासणी व कॅन्सर रोखण्याची जागृती

ByMirror

Feb 10, 2023

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व गरुड कॅन्सर हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम

कॅन्सरच्या भीतीपोटी तपासण्या होत नसल्याने रुग्ण मृत्यूकडे ओढले जातात – डॉ. प्रकाश गरुड

अहमदनगर (प्रतिनिधी)- कॅन्सरने घाबरण्याची गरज नसून, योग्य वेळी उपचार व तपासणी आवश्यक आहे. कॅन्सर प्रथम अवस्थेत तपासल्यास रुग्ण बरे होतात. मात्र भीतीपोटी लोक तपासण्या करत नसल्याने मृत्यूकडे ओढले जातात. हा आजार संसर्गजन्य नसून, लाईफस्टाईलमुळे निर्माण होणारा आजार असल्याचे प्रतिपादन कॅन्सर तज्ञ डॉ. प्रकाश गरुड यांनी केले.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व गरुड कॅन्सर हॉस्पिटल आणि रेडिएशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर व विविध आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. गरुड बोलत होते.

वाळकी (ता. नगर) आरोग्य केंद्रात सरपंच शरद बोठे, डॉ. ससाणे व कॅन्सर सर्जन डॉ. प्रकाश गरुड, चास (ता. नगर) प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सौ. माने व स्त्रीरोग कॅन्सर तज्ज्ञ डॉ. पद्मजा गरुड, तर शहरातील गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये काकासाहेब शेळके व रेडिएशन कॅन्सर तज्ज्ञ डॉ. मनोज बिराजदार, यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संपर्कप्रमुख रणजीत परदेशी, उपजिल्हाप्रमुख काका शेळके व शहर प्रमुख अनिकेत कराळे यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


पुढे डॉ. गरुड म्हणाले की, अनुवंशिकतेनुसार काही प्रमाणात कॅन्सरचे रुग्ण आढळतात. सध्या लठ्ठपणामुळे कॅन्सरचा धोका वाढत आहे. शरीराला आवश्यक अन्न घटकाची कमतरतेने देखील कॅन्सर होत असल्याचे स्पष्ट केले. तर कॅन्सरला न घाबरता लढा देऊन त्यावर मात करण्याचे आवाहन त्यांनी केले.


डॉ. पद्मजा गरुड म्हणाल्या की, महिलांची बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, तणाव व चुकीची आहार पध्दतीमुळे ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. काही कॅन्सर शस्त्रक्रियेने तर काही औषधाने बरा होतो. ब्रेस्टमध्ये असलेल्या गाठिचे विविध प्रकार असून, पुरुषांमध्येही ब्रेस्ट कॅन्सर आढळून येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची कॅन्सर तपासणीसह नेत्र तपासणी देखील करण्यात आली. शिबिरात तोंडाचे व पोटाचे आजार, अंगावरील गाठी, बरी न होणारी जखम, वेदनेविना होणारा रक्तस्त्राव अशा विविध लक्षणांच्या रुग्णाची तपासणी करण्यात आली. यामध्ये 15 रुग्ण कॅन्सर बाधित आढळले. तर समाजात कॅन्सरचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी उपस्थितांना कॅन्सर तज्ञ डॉ. गरुड यांनी मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये निदान झालेल्या सर्व रुग्णांचे उपचार महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि केंद्र शासनाच्या पंतप्रधान जन आरोग्य योजना या योजनेमधून गरुड हॉस्पिटल येथे मोफत केले जाणार असल्याची माहिती अनिकेत कराळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *