आदिवासी नृत्याच्या कलाविष्काराचे दर्शन
आदिवासी मेळाव्यात विविध प्रश्नांवर विचारमंथन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारी महारॅली काढून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. भर पावसात आदिवासी बांधवांनी शहरवासियांना पारंपारिक आदिवासी नृत्याच्या कलाविष्काराचे दर्शन घडविले. तर पटेल मंगल कार्यालयात झालेल्या आदिवासी मेळाव्यात विविध प्रश्नांवर विचारमंथन करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
माळीवाडा बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदिवासी महारॅलीची सुरुवात झाली. आदिवासी सेवा संघ, आदिवासी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, आदिवासी युवा सेना, आदिवासी महिला ग्रुपचे पदाधिकारी सदस्य तसेच आदिवासी शासकीय मुला-मुलींच्या वस्तीगृहातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
आदिवासी बांधव पारंपारिक वेशभूषा परिधान करून रॅलीत सहभागी झाले होते. निसर्गाला देवता म्हणून पूजा करणारे आदिवासी बांधवांच्या या रॅलीत निसर्ग संवर्धनाचा संदेश दिसून आला. अकोले तालुक्यातील उडदावणे पांजरे येथील नृत्य पथक या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले. आदिवासी संस्कृतीचा नृत्याविष्कार पाण्यासाठी शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
शहरातील प्रमुख चौकातून मार्गक्रमण करुन या रॅलीचा समारोप टिळक रोड येथील पटेल मंगल कार्यालयात झाला. यावेळी आदिवासी समाजाचा मेळावा घेण्यात आला. यामध्ये आदिवासी समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणारे अधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच शिक्षण क्षेत्रात प्राविण्य मिळवणार्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
मेळाव्यात विष्णू शेळके यांनी आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी दिनाचे महत्त्व, आदिवासी क्रांतिकारकांचा स्वातंत्र्यलढा आणि आदिवासींचे शोषण याविषयी भूमिका मांडली. अॅड. योजना बेंडकोळी यांनी आदिवासी संस्कृती, श्रध्दा, अंधश्रद्धा, शिक्षण हक्क व अधिकाराबाबत विश्लेषण केले. प्रास्ताविकात जगन्नाथ सावळे यांनी आदिवासी बांधवांच्या प्रश्नावर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय भाषणात राजेंद्र बेंडकुळी यांनी आदिवासी संस्कृती, आदिवासींचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान व आदिवासी युवकांचे शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात कवि तानाजी सावळे यांनी कविता सादर केल्या. गायक जालिंदर आडे यांनी आदिवासी गीत गायन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या मेळाव्यासाठी जिल्हा परिषदचे कृषी अधिकारी शंकर किरवे, सहनिबंधक (पुणे) ज्ञानदेव तुकमे, काशीनाथ गवारी, श्रेयश धिंदळे, पालिकेचे एस.एम. तडवी, महेश शेळके, कविराज बोठे, शंकर लांघी, हिरामण पोपरे, नितीन साबळे, दिनकर भांगरे, संतोष नवले, किरण शेळके, सुरेश शेंगाळ, सोनवणे, उज्वला गवारि, शिवानंद भांगरे, भरत साबळे, बाळकृष्ण धिंदळे, हिराबाई मुठे आदींसह आदिवासी समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.