शुक्रवारी माता की चौकी, तर 4 ऑक्टोबरला रंगणार दांडिया रास गरबा
अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरात विधीवत पूजा करुन सोमवारी (दि.26 सप्टेंबर) सकाळी उत्साहात घटस्थापना करण्यात आली. नवरात्र उत्सवानिमित्त राधा-कृष्ण मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता यांच्या हस्ते घटस्थापना झाली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शीख, पंजाबी भाविकांनी देवीचा जयघोष केला. गेल्या 56 वर्षापासून मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापना करुन विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
या वर्षी दररोज संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत किर्तन होणार आहे. तर दररोज संध्याकाळी 7 वाजता आरती होणार आहे. नवरात्रनिमित्त मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून, शुक्रवारी दि.30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता राजेश अलग ग्रुपचा माता की चौकी कार्यक्रम होणार आहे. यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.


मंगळवारी दि.4 ऑक्टोबर रोजी सकाळी पुर्णाहूती यज्ञ होणार आहे. तर संध्याकाळी सेवाप्रित सोशल फाऊंडेशनच्या वतीने समाजातील महिलांसाठी दांडिया रास गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन राधा-कृष्ण मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

