• Thu. Feb 6th, 2025

शहरातील पाण्याच्या टाकीवरील चित्र वेधत आहे सर्वांचे लक्ष

ByMirror

Feb 15, 2022

हरहुन्नरी कलाकार निसार पठाण यांनी शंभर फुट उंचीवर रेखाटले सिटीबर्ड व महात्मा गांधी

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महानगरपालिकेने राष्ट्रीय पातळीवरील स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ शहर अभियान स्पर्धेत सहभाग घेऊन स्वच्छ व सुंदर शहर म्हणून राज्यासह केंद्रात ठसा उमटविला आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय व काही सरकारी कार्यालयाच्या भिंती विविध सामाजिक संदेश देणार्‍या चित्रांनी रंगल्या आहेत. शहरातील पाण्याच्या टाक्या देखील आकर्षक चित्रांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत असून, या चित्रांना जिवंत करणारे शहरातील हरहुन्नरी कलाकार निसार पठाण यांनी डिएसपी चौक येथील पाण्याच्या टाकीवर एका बाजूला सिटीबर्ड (शहरपक्षी) निळा खंड्या तर दुसर्‍या बाजूने महात्मा गांधीचे आकर्षक चित्र रेखाटले आहे.
माझी वसुंधरा अभियानमधे नगर- औरंगाबाद महामार्गावरील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भिंतीवर निसार पठाण व त्यांचे सहकारी बाळासाहेब गायकवाड, विजय आगळे यांनी जनजागृतीचे संदेश देत हुबेहुब विविध चित्र रंगवले असून, शहरात सध्या हा चर्चेचा विषय आहे. पठाण यांनी डिएसपी चौक येथे रंगवलेली पाण्याची टाकी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नवीन जिल्हाधिकारी कार्यालया समोरील रंगवलेल्या आकर्षक भिंतीचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्वत: काम सुरु असताना चित्रांची दोन वेळा पहाणी करुन कलाकारांचे कौतुक केले होते.
निसार पठाण हे भित्तीचित्र रेखाटण्यासाठी राज्यभरात प्रसिध्द आहेत. त्यांनी राज्यभर विविध व्यापारी कंपन्यांच्या जाहीराती भिंतीवर रंगविल्या आहेत. तसेच वाडियापार्क क्रीडा संकुल येथे देखील शहराच्या ऐतिहासिक वास्तूंचा ठेवा त्यांनी रेखाटला असून, त्याचे देखील जिल्हाभर कौतुक झाले होते. त्यांनी काढलेली चित्रे इतकी हुबेहुब असतात की, हात लावून पहाण्याचा मोह अवरत नाही. शंभर फुट उंचीवर असलेल्या 20 फुटी उंच व 240 फुटाचा गोलाकार व्यास असलेले चित्र त्यांनी रेखाटले आहे. उभ्या भिंतीवर चित्र काढणे शक्य असून, गोलाकार भिंतीवर अतिशय अवघड असलेले चित्र त्यांनी उत्तमपणे साकारले आहे. निसार पठाण आणि सहकारी यांच्या कलाकारीसाठी मनपा पदाधिकारी महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजुरकर, डॉ. शंकर शेडाळे, उद्यान विभागाचे शशीकांत नजान, घनकचरा अधिकारी बिडकर, अलिस सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले. या चित्रांबद्दल पठाण यांचे विशेष कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *