• Wed. Jan 22nd, 2025

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी व रजा रोखीकरणाची प्रकरणे मार्गी लावावी -बाबासाहेब बोडखे

ByMirror

Sep 3, 2022

शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली शिक्षणाधिकारी यांची भेट

पुढील आठवड्यात रजा रोखीकरणाची प्रकरणे मार्गी लावण्याचे व वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीसाठी तात्काळ शिबीर घेणार असल्याचे शिक्षणाधिकारी कडूस यांचे आश्‍वासन

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातील नियमानुसार पात्र शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणीचे प्रस्ताव व रजा रोखीकरणाची प्रकरणे मार्गी लावण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना देण्यात आले. सदर प्रश्‍नाबाबत शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन याप्रश्‍नावर चर्चा केली. यावेळी शिक्षणाधिकारी कडूस यांनी रजा रोखीकरणाची प्रकरणे पुढील आठवड्यात मार्गी लावण्याचे व तात्काळ शिबीर घेऊन पात्र शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतनश्रेणीचा लाभ देण्याचे आश्‍वासन दिले.


यावेळी महानगर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव बेरड, सचिव प्रा. बाबासाहेब शिंदे, सोहेल शेख, किशोर अहिरे, साहेबा बोडखे, मीनाक्षी बोडखे, शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष बबन शिंदे, अशोक पवार, आर.एम. टापरे, एस.डी. भालेराव, बी.व्ही म्हस्के, आर.व्ही. धात्रक, ज्ञानेश्‍वर शिंदे आदी उपस्थित होते.


जिल्ह्यातील अनेक शिक्षक बंधू भगिनींना वरिष्ठ व निवड श्रेणी पासून वंचित आहेत. शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्यामुळे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण महाराष्ट्र (पुणे) यांच्या मार्फत जून 2022 ते जुलै 2022 या कालावधीमध्ये पात्र शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.


सदर कालावधीमध्ये तसेच यापूर्वीही विहित कालावधीमध्ये सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांना वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी लागू होण्याकरिता तात्काळ संबंधित मुख्याध्यापक व संस्था चालकांना संबंधित विद्यालयातील प्रस्ताव दाखल करण्यासंबंधीत विद्यालयातील सेवाज्येष्ठतेनुसार पात्र शिक्षक बंधू भगिनींचे प्रस्ताव जिल्हा परिषद येथे विहित मुदतीत दाखल करण्यासंबंधीत आदेश पारित करावे. तसेच प्रस्ताव प्राप्त होण्यासाठी दिलेल्या विहित मुदतीत वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव कार्यालयात दाखल झाल्यानंतर नवीन दाखल झालेले प्रस्ताव व यापूर्वी नियमानुसार पात्र कर्मचार्‍यांचे प्राप्त झालेले प्रलंबित वरिष्ठ व निवड श्रेणीची प्रस्ताव मंजुरीसाठी विशेष मान्यता शिबीराचे आयोजन करून पात्र शिक्षकांना तात्काळ वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


सातवा वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता त्वरित देण्यात यावा, प्रलंबित वैद्यकीय बिले तात्काळ अदा करावीत, सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे रजा रोखीकरण बिल तात्काळ अदा करण्यात यावे, जिल्ह्यातील प्रलंबित पुरवणी देयके तात्काळ मंजूर करावीत, माध्यमिक शिक्षकांची बीएलओ कामातून मुक्तता करावी व जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *