अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना लोककला, कलावंत साहित्यिक परिषदच्या वतीने राज्यस्तरीय क्रीडा भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने रविवारी (दि.17 एप्रिल) श्रीरामपूर येथे होणार्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलनात डोंगरे यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पवार व कवी आनंदा साळवे यांनी दिली.
आमदार लहू कानडे, संमेलन अध्यक्ष साहित्यिक सुभाष सोनवणे, स्वागताध्यक्ष सुधाकर ससाणे, शब्दगंध परिषदेचे सुनिल गोसावी, प्रा. गुंफाताई कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील सामाजिक कार्यकर्ते पै.नाना डोंगरे शाळेत कार्यरत असून देखील स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य सुरु आहे. ग्रामीण भागात वृक्षरोपण, बीजरोपण व वृक्षसंवर्धनासाठी विविध कार्यक्रम घेऊन त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी मोठी जनजागृती केली आहे. डोंगरे यांनी जिल्हा पातळीवर स्त्री जन्माचे स्वागत, वृक्षरोपण, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, मतदार जागृती, जलसंधारण जागृती मोहिम व रक्तदान शिबीर व्यापक स्वरुपात राबविल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे बाबासाहेब पवार यांनी म्हंटले आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डोंगरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.