राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर वाहतूक शाखेला निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने, रात्री ते सकाळ पर्यंत औरंगाबाद महामार्गावरुन येणारी अवजड वाहनाची वाहतूक रमजानच्या पार्श्वभूमीवर झेंडीगेट, कोठला व सर्जेपुरा मार्गाने न वळविता पर्यायी मार्गाने वळविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांनी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांना दिले. यावेळी शहर उपाध्यक्ष अब्दुल खोकर, शहानवाज शेख आदी उपस्थित होते.
नुकताच मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरु झाला आहे. शहरातील उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने, हॉटेल अशोका येथून रात्री ते सकाळ पर्यंत नगर-पुणे महामार्ग बंद ठेवण्यात येतो. परिणामी औरंगाबाद महामार्गावरुन येणारी अवजड वाहनाची वाहतूक झेंडीगेट, कोठला व सर्जेपुरा मार्गाने वळविण्यात आली आहे. रमजान निमित्त मुस्लिम बहुलभाग असलेल्या झेंडीगेट, कोठला व सर्जेपुरा येथे नागरिक, लहान मुले पहाटेच उपवास करण्यासाठी लवकर उठत असतात. तसेच मशिदीत नमाज पठणसाठी जातात. तर महिलांची देखील सकाळी पाणी भरण्यासाठी व दिवसाची तयारीची लगभग सुरु असते. रमजान महिन्यात रात्री तरावीहची नमाज सर्व मशिदीमधून अदा केली जाते. यामुळे सदर भागात नागरिक पहाटे लवकर व रात्री उशीरा मोठ्या संख्येने घराबाहेर असतात. अशा परिस्थितीमध्ये या भागातून रात्री ते सकाळ पर्यंत वळविण्यात आलेल्या अवजड वाहनामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शहरात दिवासाही अवजड वाहने सुरु असून, यामुळे अनेक अपघात होऊन काहींचा जीव देखील गेला आहे. अवजड वाहनामुळे सणा-सुदीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा काही अनुचित प्रकार व अपघात घडल्यास याची संपुर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
रात्री ते सकाळ पर्यंत औरंगाबाद महामार्गावरुन येणारे अवजड वाहनाची वाहतूक रमजानच्या पार्श्वभूमीवर झेंडीगेट, कोठला व सर्जेपुरा मार्गाने न वळविता पर्यायी मार्गाने वळविल्यास नागरिक व्यवस्थितपणे व सुरक्षित पहाटे व रात्री घराबाहेर पडू शकतील. तातडीने मुस्लिमबहुल भागातून रात्री ते सकाळ पर्यंत होणारी अवजड वाहनाची वाहतुक इतर पर्यायी मार्गाने वळविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.