• Fri. Mar 21st, 2025

यूपीएससीत यश मिळवलेल्या शहरातील युवकाचा आमदार संग्राम जगताप यांनी केला गौरव

ByMirror

Jul 26, 2022

यूपीएससीद्वारे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये संदीप शिंदे भारतात 32 वा

स्पर्धात्मक जगात टिकायचे असेल मेहनतीशिवाय पर्याय नाही -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्पर्धात्मक जगात टिकायचे असेल मेहनतीशिवाय पर्याय नाही. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुले चार ते पाच वर्ष सगळ सोडून फक्त यशावर फोकस करतात. ते ध्येय गाठण्यासाठी मोठ्या जिद्दीने श्रमाची पराकाष्टा करतात. संदीप शिंदे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेत मिळवलेले यश युवकांना प्रेरणादायी आहे. त्याने मिळवलेल्या यशाने शहराचे नाव उंचावले असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


शहरातील संदीप कारभारी शिंदे या युवकाने केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस (आयएफएस) च्या झालेल्या परीक्षेत संपूर्ण भारतामधून 32 वा क्रमांक पटकाविल्याबद्दल त्यांचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, अर्बन सेलचे प्रा. अरविंद शिंदे, राहुल ठोंबरे आदी उपस्थित होते.


संदीप शिंदे म्हणाले की, स्पर्धा परीक्षेत शेवट पर्यंत संयम ठेवणे आवश्यक आहे. जिद्दीने परीक्षेला सामोरे गेल्यास यश निश्‍चित आहे. स्पर्धेत परीक्षेच्या तयारीला जाताना आई-वडील व मित्र मंडळींकडून पाठबळ मिळणे आवश्यक आहे. आर्थिक व मानसिक पाठबळ असल्यास या परीक्षा सहज शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रा. माणिक विधाते यांनी संदीप शिंदे शहरातील युवकांसाठी आयडॉल ठरला असून, आपली गुणवत्ता ओळखण्यासाठी युवकांनी स्पर्धा परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. या क्षेत्रात अनेक संधी असून, युवकांचे भविष्य स्पर्धा परीक्षेतून बदलणार असल्याचे त्यांनी सांगितले.


संदीप शिंदे हे सावेडी येथील रहिवाशी असून, त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अशोकभाऊ फिरोदियामध्ये झालेले आहे. महाविद्यालयीन शिक्षण शहरातील शासकीय तंत्रनिकेत येथे (डिप्लोमा) झाले. त्यानंतर त्यांनी इंजीनियरिंगचे शिक्षण पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज येथे केले. इंजीनियरिंगच्या मास्टर डिग्रीचे शिक्षण विखे पाटील महाविद्यालयात झाले. त्यांनी 2015 पासून दिल्ली येथील अकॅडमीत स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *