सदृढ बालकाच्या जन्मासाठी मातेला योग्य आहार, व्यायाम व मार्गदर्शनाची गरज -अश्विनी जाधव
अहमदनगर (प्रतिनिधी)- सदृढ व निरोगी बालकाच्या जन्मासाठी गरोदर मातेला योग्य आहार, व्यायाम व तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. एखादे झाड लावताना त्याची ज्या प्रकारे काळजी घेतली जाते, त्याप्रमाणे गर्भावर देखील योगसंस्कार झाल्यास सदृढ बालके जन्माला येतात. यासाठी गर्भसंस्कार काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन नगरसेविका अश्विनी सचिन जाधव यांनी केले.
शहरातील किंग रोड, रामचंद्र खुंट येथील केअर अॅण्ड क्युअर हॉस्पिटलमध्ये महिलांना गर्भधारणेपुर्वी व प्रसुतीनंतर घ्यावयाची काळजी या विषयावर मोफत व्याख्यान व मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाच्या उद्घाटनाप्रसंगी नगरसेविका जाधव बोलत होत्या.
व्याख्यानाचे मार्गदर्शक स्त्री रोग तज्ञ डॉ. मारिया शेख म्हणाल्या की, स्त्री-रोग तज्ञ डॉक्टर व महिलांमध्ये संवाद वाढल्यास अनेक शंकाचे निरसन होणार आहे. या दृष्टीकोनाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. मातेच्या गर्भात असलेल्या बालकावर संस्कार होण्यास सुरुवात होते. यासाठी मातेचे आहार व व्यायामाकडे लक्ष देण्याची गरज भासते. महिलांमध्ये अनेक चुकीचे गैरसमज असून, ते दूर करण्याचे काम या गर्भसंस्कार वर्गातून केले जाणार आहे. दरमहिन्याला महिलांसाठी या उपक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट करुन गर्भधारणेपूर्वी महिलेचे आहार, व्यायाम तसेच प्रसुतीनंतर माता व बाळकाच्या काळजीबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत स्त्री रोग तज्ञ डॉ. कुदरत शेख यांनी केले. आभार डॉ. सईद शेख यांनी मानले.