राष्ट्रवादीचे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन
दुर्देवी घटनेला राज्य सरकारच पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारच्या वतीने खारघर (मुंबई) येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात झालेल्या मृत्यूकांडला जबाबदार असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, अर्बन सेलचे अरविंद शिंदे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, वकिल सेलचे अॅड. योगेश नेमाणे, कामगार सेलचे गजेंद्र भांडवलकर, फुले ब्रिगेड अध्यक्ष दिपक खेडकर, व्यापार व उद्योग सेलचे अनंत गारदे, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, ओबीसी सेलचे अमित खामकर, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, संतोष ढाकणे, साधना बोरुडे, मोना विधाते, मारुती पवार, गणेश बोरुडे, विशाल बेलपवार, अभिजीत सपकाळ, ऋषिकेश ताठे, शिवम भंडारी, अॅड. युवराज शिंदे, धीरज उकिर्डे, सुरेश वैरागर, अंकुश चत्तर, मळू गाडळकर, उमेश धोंडे, सुजाता दिवटे, मोहन गाडे, वैभव म्हस्के, आशिष भगत आदी उपस्थित होते.

खारघर (मुंबई) येथे 16 एप्रिल रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या अनुयायींची चेंगरा-चेंगरी झाली. यामध्ये अनेक अनुयायी जखमी झाले व किमान पंधरा निष्पाप अनुयायांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राज्यात उष्णतेची लाट असतांना देखील सदरील कार्यक्रम भर उन्हात मैदानामध्ये ठेवण्यात आला होत. लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार्या एका कंपनीला महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाचे नियोजन कोट्यावधी रुपये देऊन करण्यात आले होते. एवढा खर्च करुन देखील उपस्थितांना पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती, सुमारे सात तास अनुयायी भर उन्हात अन्न, पाणीशिवाय बसून होते. या ढिसाळ नियोजनामुळे रुग्णवाहिका देखील रुग्णांपर्यंत उशीराने पोहचल्या. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू आणणारी ही घटना घडली असताना, यामध्ये जाहीर केलेल्या संख्येपेक्षा अधिक नागरिक मृत्यूमुखी पडले आहे. शेकडो लोक जखमी झाल्याचे उघडकीस येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन सत्य जनतेसमोर येणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या दुर्देवी घटनेला राज्याचे शिंदे-फडणवीस सरकारच पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप करुन, मृत्यूकांडला जबाबदार असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.