शहरात जागतिक स्वमग्न दिवस साजरा
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महानगरपालिका शिक्षण विभाग समग्र शिक्षा समावेशित शिक्षण अंतर्गत रिमांड केंद्राच्या वतीने ए. टी. यु. जदिद उर्दू प्राथमिक शाळा व कै.वि.ल.कुलकर्णी प्राथमिक शाळेत जागतिक स्वमग्न जागृती दिवस साजरा करण्यात आला. शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप करुन त्यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडण्यात आले.
महानगरपालिका शिक्षण विभाग रिमांड केंद्राचे विशेष शिक्षक उमेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. शिंदे यांनी स्वमग्न दिव्यांगविषयी माहिती देऊन स्वमग्न म्हणजे काय? त्याची लक्षणे? करणे? निदान? उपचार पद्धती? याविषयी सविस्तर माहिती दिली. आपण सर्वांनी या विद्यार्थ्यांसमवेत सहभागी होऊन त्यांना समाजात सन्मानाने जगण्यासाठी योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले. उर्दू शाळेचे मुख्याध्यापक नासीर खान यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांशी कस वागावं, मिळून मिसळून राहण्याविषयी मत व्यक्त केलं. या उपक्रमात कै.वि.ल. कुलकर्णी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा धरम, मेघा पवार, अन्सार शेख, नसरिन शेख आदी शिक्षकांनी सहभाग नोंदवला.