• Thu. Feb 6th, 2025

भाळवणीच्या सरकारी जमीन भूखंड घोटाळ्यात लॅण्ड माफियाला मोकळीक

ByMirror

Oct 4, 2022

जमीन देणार्‍याप्रमाणे जमीन घेणार व संबंधित महसुलच्या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल व्हावे

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशचे पारनेर तहसिल समोर उपोषण

अहमदनगर (प्रतिनिधी)- भाळवणी (ता. पारनेर) येथील सरकारी जमीन भूखंड घोटाळ्यात जमीन देणारवर गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणात सहभागी असलेले जमीन घेणार व संबंधित महसुलच्या अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या वतीने पारनेर तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशचे राज्य उपाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उपोषणात जिल्हाध्यक्ष उमेश गायकवाड, भानुदास साळवे, योगेश कुलथे आदी सहभागी झाले होते.


भाळवणी (ता. पारनेर) येथील सरकारी भूखंड जमीन भोगवाटादार वर्ग 2 ची जमीन शासनाची फसवणूक करून खरेदी-विक्री करण्यात आली. याप्रकरणी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा करुन जमीन देणार, घेणार, साक्षीदार व संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या प्रकरणामध्ये सर्वच दोषी असून, फक्त जमीन विक्री करणार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जमीन घेणार्‍या लॅण्ड माफियाला यामध्ये मोकळीक देण्यात आली असून, अधिकारी राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. तर याप्रकरणी महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे लक्ष वेधले जाणार आहे. या प्रकरणात योग्य तपास होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असून, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबेळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरु असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.


भाळवणीच्या सरकारी जमीन भूखंड घोटाळ्यातील जमीन घेणार, साक्षीदार व संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावे, शासकीय योजनेचा दुबार लाभ घेतल्याप्रकरणी गट नंबर 701/6 शासनाची शासकीय जमीन सरकार जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांना देण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *