अनुसूचित जातीमधील वंचित घटकांना प्रवाहात आनण्याच्या प्रमुख उद्देशाने कार्य करणार -शारदा गायकवाड
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी शारदा अंतोन गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. महिला मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्षा कुसुमताई शेलार यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र दिले.
शारदा गायकवाड या नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षा असून, त्या सामाजिक कार्यात सक्रीय आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक गरजूंना मदतीचा हात दिला होता. तसेच भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून नागापूर येथील अमरधाममध्ये अनेक कोरोनाने मयत झालेल्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी महिला मोर्चाचे सदस्य म्हणून देखील काम पाहिले आहे. त्यांच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सुरु असलेल्या कार्याची दखल घेऊन भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे कुसुमताई शेलार यांनी स्पष्ट केले.
शारदा गायकवाड म्हणाल्या की, भाजपच्या ध्येयधोरणानुसार अनुसूचित जाती महिला मोर्चाचे काम करणार असून, अनुसूचित जातीच्या सर्व छोट्या-मोठ्या आणि वंचित घटकांपर्यंत केंद्र शासन व राज्य शासन यांच्या सर्व योजना पोहचविण्यासाठी सक्रीय राहणार आहे. वंचितांना प्रवाहात आनण्याचा प्रमुख उद्देश राहणार असून, यासाठी भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या माध्यमातून महिलांना संघटित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडीबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र (भैय्या) गंधे, अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटोळे, शहर जिल्हाउपाध्यक्ष रोहन शेलार आदींनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.