अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथील ओंकार बाबासाहेब भालसिंग खून प्रकरण व मोकांतर्गत कारवाई झालेल्या आरोपी सचिन चंद्रकांत भांबरे याला विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस. गोसावी यांनी 50 हजारांची व्यक्तिगत जामीनावर आरोपीस जामीन मंजूर केला आहे.
ओंकार भालसिंग याला 17 नोव्हेंबर 2022 रोजी गाडीला धक्का देऊन जबरदस्ती अपहरण करून अनोळखी ठिकाणी नेऊन मारहाण केल्याबाबत विश्वजीत कासार व इतर आठ आरोपींविरुध्द नगर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचार दरम्यान ओंकार भालसिंग यांचा मृत्यू झाल्यानंतर सदर गुन्ह्यात भा.द.वी. कलम 302 वाढविण्यात आला होता. विश्वजीत कासार व टोळी विरुद्ध मोकांतर्गत कारवाई होऊन दोषारोपपत्र विशेष मोक्का न्यायालयात दाखल करण्यात आले होते. सदर गुन्ह्यामध्ये सचिन चंद्रकांत भांबरे याला 17 एप्रिल 2022 रोजी अटक करण्यात आली होती.

सचिन भांबरे यांने अॅड. सरिता साबळे यांच्या मार्फत विशेष मोक्का न्यायालयात जामीन अर्ज ठेवला होता. आरोपी सचिन भाबरे यांच्या बाजूने युक्तिवाद करत अॅड. साबळे यांनी फिर्यादीने सचिन भांबरे यांच्या नावाचा फिर्यादीमध्ये उल्लेख केला नव्हता. तसेच प्रथम दर्शनीय साक्षीदारामार्फत पोलीसांनी आरोपीची ओळख पेरड घेतली नव्हती व इतर साक्षीदारांचा जबाब हा एक दिवस उशिरा नोंदविला होता. फिर्यादीचा मृत्यू कोरोना प्रादुर्भावाने झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने तसेच सर्वोच्च न्यायालयाचे ठोस न्याय निवाडे देऊन, आरोपीच्या वतीने युक्तीवाद करण्यात आल्याचे अॅड. साबळे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.
सरकार पक्ष व आरोपीच्या वकीलाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन विशेष मोक्का न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वतीने अॅड. सरिता साबळे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. सतीश गीते, अॅड. निकिता गायकवाड, अॅड. ज्योत्सना ससाणे यांनी सहकार्य केले.