जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र व उमंग फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम
विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे धडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र व उमंग फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून पिंपळगाव उज्जैनी (ता. नगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी योग शिबीर घेण्यात आले. या योग शिबीरात विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे धडे देण्यात आले.
या शिबीरात योगा शिक्षक सुनिल मोहिते यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह आसनं करुन योगाचे धडे दिले. शरीर स्वास्थ्य व मन एकाग्र राहण्यासाठी त्यांनी विविध आसने व प्राणायाम विद्यार्थ्यांकडून करुन घेतले. यावेळी मुख्याध्यापक भिवसेन चत्तर, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिर्हे, सचिव वैशाली कुलकर्णी, सहशिक्षक रावसाहेब पिंपळे, विलास कांडेकर, संतोष रोकडे, अंबादास गाडगे, संजीवनी ससे, माणिक आल्हाट, संतोष आल्हाट, शैला उंडे आदी उपस्थित होते.
डॉ. संतोष गिर्हे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौध्दिक विकासासाठी योग, प्राणायाम महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहिल्यास ते सर्वच क्षेत्रात प्रगती करु शकतात. योगाने विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहणार आहे. प्राणायामाने मन एकाग्र होऊन त्यांचा बौध्दिक विकास देखील साधला जाणार आहे. योग दिन एक दिवसा पुरता मर्यादीत न ठेवता वर्षभर दररोज सकाळी योग व प्राणायाम करण्याचे त्यांनी आवाहन केले.
या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे, जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी व क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वय अधिकारी शिवाजी खरात, क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, ज्ञानेश्वर खुरांगे, जय असोसिएशन ऑफ एनजीओचे अॅड. महेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.