जागतिक पशुचिकित्सा दिनाचा जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय व जायंट्स ग्रुपचा संयुक्त उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक पशुचिकित्सा दिवसानिमित्त शहरात जनावर व पशुंची निशुल्क तपासणी करुन त्यांना रोग प्रतिबंधक (अॅन्टी रेबीज), धनुर्वातचे लसीकरण करुन जंत प्रतिबंधक मोफत औषधे देण्यात आले. जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय व जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिराला शहरातील पशुपालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
जुने बस स्थानक जवळील जिल्हा पशु सर्व चिकित्सालय हॉस्पिटलमध्ये झालेल्या या शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. रामदास गाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. मुकुंद राजळे, आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, जायंटस् वेल्फेअर फाउंडेशनचे संजय गुगळे, जायंटस् ग्रुपच्या अध्यक्षा पूजा पातुरकर, विद्या तन्वर, केमिस्ट संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष सुधीर लांडगे, डॉ.बाबासाहेब कडूस, अनिल गांधी, दिनेश शिंदे, दर्शन गुगळे, अमित मुनोत, पराग गांधी आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात संजय गुगळे यांनी जायंट्स ग्रुपच्या वतीने राबविण्यात येणार्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती देवून, सर्व जनावरांसाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे हे 23 वे वर्ष असल्याचे सांगितले. सुधीर लांडगे यांनी मुक्या प्राण्यांची सेवा हे सर्वात जास्त पुण्याचे काम आहे. त्यांच्या वेदना जाणून त्या दूर करण्याचे काम पशुचिकित्सक करत असल्याचे सांगितले.
डॉ. रामदास गाडे म्हणाले की, पशुसेवा ही ईश्वरसेवाच आहे. मुक्या प्राण्यांना दया दाखविणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. पशुपक्षी आपल्या भावना त्यांच्या वेगळ्या भाषेतून व्यक्त करतात. त्यांचे दुःख वेदना समजून पशुचिकित्सक त्यांच्यावर सर्व प्रकारचे उपचार करत असल्याचे सांगितले. डॉ. मुकुंद राजळे यांनी जायंट्स ग्रुप जनावर व पशुंच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने सातत्याने घेत असलेले शिबिर दिशादर्शक असल्याचे स्पष्ट करुन, तसेच पशुपालकांना पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची निगा राखण्याचे आवाहन केले.
राजेंद्र कटारिया म्हणाले की, पशु हे त्यांच्या वेदना व व्यथा मांडू शकत नाही. त्यांचे काय दुखते त्यांना सांगता येत नसून, पशुचिकित्सक त्यांच्या वेदना समजून उपचार करत असतात. जनावरांच्या रोगाचे निदान करुन उपचार करणे अवघड बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनिल तुंभारे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय कुंकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. यामध्ये घोडे, कुत्रे, गाई, म्हशी, मांजर, शेळ्या आदी 190 पाळीव प्राण्यांची आरोग्य तपासणी करुन उपचार करण्यात आले. या शिबिराला डॉ. वसंत गारुडकर, डॉ. अनिल कराळे, डॉ. ज्ञानेश्वर काळे, डॉ. अनिल गडाख, डॉ. नमिता धनवडे, डॉ. वर्षा साबळे, डॉ. शशिकांत कारखिले, अजय मेडिकल, शारदा एजन्सी व कडूस डिस्ट्रीब्यूटर्सचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजकुमार चव्हाण यांनी केले. आभार पूजा पातुरकर यांनी मानले.