मोफत नेत्र शिबीरातून कोरोनाकाळात गरजूंना आधार व नेत्रदान चळवळीतील सक्रीय योगदानाबद्दल सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन अधिकारी, कर्मचारी महासंघाच्या वतीने टाळेबंदीत दीन, दुबळ्यांना आधार देण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मोफत आरोग्य व नेत्र शिबीर तसेच नेत्रदान चळवळीत सक्रीय योगदानाबद्दल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांना शिव, फुले, शाहू, आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देण्यात आला.
शहरातील शासकीय विश्रामगृह येथे बहुजन अधिकारी, कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष एस.आर. भोसले यांच्या हस्ते बोरुडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी महात्मा फुले विद्यापिठाचे क्रीडा अधिकारी दिलीप गायकवाड, रतन तुपविहीरे, पी.के. गवांदे, जगन्नाथ म्हस्के, प्रकाश साळवे, वा.ना. राक्षे, ए.एस. जाधव, सचिन पैठणकर, राजू मखरे, सुभाष सोनवणे, मल्हारी भिंगारदिवे, संजय भिंगारदिवे, किरण शिरसाठ आदी उपस्थित होते.
एस.आर. भोसले म्हणाले की, दृष्टीदोष असलेल्या दीन, दुबळ्यांचे जीवन प्रकाशमय करण्याचे काम जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून केले. कोणतेही राजकीय व शासकीय पाठबळ नसताना पाटबंधारे विभागात कार्यरत राहून स्वखर्चाने त्यांनी सर्वसामान्यांसाठी चालवलेली चळवळ प्रेरणादायी आहे. कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांची गरज ओळखून निशुल्क आरोग्य व नेत्र शिबीर घेऊन त्यांना आधार देण्याचे कार्य केले. या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून, राष्ट्रीय अंधत्व समितीतर्फे त्यांचा सन्मान देखील झाला. ही जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे. नेत्रदान चळवळीच्या माध्यमातून हजारो व्यक्तींना नवदृष्टी देण्यासाठी त्यांचे सुरु असलेले कार्य दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेब भुजबळ
दिलीप गायकवाड म्हणाले की, आरोग्य सुविधा खर्चिक असल्याने सर्वसामान्यांच्या परवडत नाही. कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असताना आरोग्य सुविधा घेणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये माणुसकीच्या भावनेने फिनिक्सचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना जालिंदर बोरुडे म्हणाले की, निस्वार्थ भावनेने फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने कार्य सुरु आहे. शासनाची तसेच कोणत्याही संस्थेकडून आर्थिक मदत न घेता गेल्या तीस वर्षापासून मोफत नेत्र शिबीर घेऊन अडीच लाखापेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. फाऊंडेशनच्या माध्यमातून नेत्रदान चळवळीतही कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.