छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन युवकांनी जीवनाचे ध्येय गाठावे -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवनाथ विद्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. नवनाथ विद्यालयात गटशिक्षणाधिकारी विलास जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी विस्तार अधिकारी निर्मला साठे, केंद्र प्रमुख बाळासाहेब दळवी, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, प्र. मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, माजी मुख्याध्यापक किसन वाबळे, वनरक्षक अफसर पठाण, अमोल वाबळे, संतोष रोहोकले, मंगल शिंदे, मुमताज शेख, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, राधा फलके, वर्षा वाघुले, गणेश येणारे, वाचनालयाच्या उपाध्यक्षा प्रियंका डोंगरे-ठाणगे, प्रकाश वाघुले आदींसह शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी होते.

पै. नाना डोंगरे म्हणाले की, ज्या वयात शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले त्या वयात युवा वर्ग व्यसनामुळे आपले जीवन उध्वस्त करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन युवकांनी संकटांना न घाबरता आपल्या जीवनातील ध्येय गाठावे. यशाकडे वाटचाल करताना संकटे येत असतात, त्या संकटातून मार्ग काढण्याचे त्यांनी आवाहन केले.
गटशिक्षणाधिकारी विलास जाधव म्हणाले की, महापुरुषांचा आदर्श व आई- वडिलांचा त्याग समोर ठेऊन युवकांनी आपल्या जीवनाची वाटचाल करावी. देशातील युवाशक्तीच्या सहकार्यानेच अनेक प्रश्न सुटणार आहे. शिवरायांचा आदर्श समोर ठेऊन युवा पिढी घडविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.