एकता फाऊंडेशन ट्रस्टचा उपक्रम
लोकशाही सदृढ होण्यासाठी मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग महत्त्वाचा -अतुल फलके
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे एकता फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने गावाच्या पंचक्रोशीतील युवक-युवतींची ऑनलाईन मतदार नोंदणी करण्यात आली. लोकशाही मजबुतीसाठी व विकासासाठी मतदान प्रक्रियेत युवा मतदारांचा सक्रिय सहभाग राहण्यासाठी गावात नाव नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानाला युवक-युवतींसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
एकता फाऊंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष तथा सोसायटी सदस्य अतुल फलके यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या शिबिराप्रसंगी डॉ. विजय जाधव, ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, पिंटू जाधव, सोमनाथ फलके, अनिल डोंगरे, संतोष फलके, आकाश कर्डिले, अरुण कापसे, अतुल जाधव, सुभाष जाधव, भाऊसाहेब जाधव, अण्णा जाधव, गोकुळ जाधव, किरण फलके, गौरव काळे, बाळासाहेब जाधव, वसंत फलके आदी उपस्थित होते.
अतुल फलके म्हणाले की, लोकशाही सदृढ होण्यासाठी युवकांसह प्रत्येक नागरिकांचा मतदान प्रक्रियेत सहभाग महत्त्वाचा आहे. युवकांनी जागृकतेने मतदान प्रक्रियेत सहभाग घेतल्यास चांगले उमेदवार निवडून येऊन, गावाचा विकास साधला जाणार आहे. शंभर टक्के मतदान झाल्यास खर्या अर्थाने लोकशाही असतित्वात येणार असून, यासाठी नवमतदारांची नाव नोंदणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
गावातील 18 वर्षापुढील युवक-युवतींचे मतदार यादीत नांव समाविष्ट होण्यासाठी मतदान नाव नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानात नव मतदारांना नांव नोंदणीसह ग्रामस्थांना मतदान यादीतून नाव कमी करणे, एकाच मतदार संघात नाव स्थलांतरीत करणे, नाव, वय व पत्ता दुरुस्तीसाठी अर्ज भरुन घेण्यात आले.