कोरोनानंतर काही कुटुंब स्थलांतरित झाल्याचे निदर्शनास
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या मिशन झिरो ड्रॉप आऊट अभियानातंर्गत निमगाव वाघा (ता. नगर) येथे वाडी-वस्तींवर जाऊन शालाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांचा शोध घेण्यात आला. जिल्हाभर हे अभियान सुरु असून, गावात झालेल्या या सर्व्हेक्षणात कोरोनानंतर काही कुटुंब स्थलांतरित झाल्याचे आढळून आले.
नवनाथ विद्यालयाच्या शिक्षकांनी गाव परिसरासह वाडी-वस्तींवर जाऊन शालाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांची माहिती घेतली. या अभियानात शुभांगी धामणे, मंदा साळवे, चंद्रकांत पवार, निळकंठ वाघमारे, उत्तम कांडेकर, ग्रामपंचायत सदस्य तथा मिशन झिरो ड्रॉप आऊट गावस्तर समितीचे सदस्य पै. नाना डोंगरे सहभागी झाले होते.
शिक्षण विभागाच्या वतीने शालाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी 5 ते 20 जुलै या कालावधीत मिशन झिरो ड्रॉप आऊट हे अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी गाव पातळीवर अभियान राबविण्यात आले. या अभियानासाठी सरपंच रुपाली जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भागचंद जाधव, कामगार तलाठी प्रमोद गायकवाड, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, आरोग्यसेवक एम.के. गायकवाड, अंगणवाडी सेविका वैशाली फलके, मुख्याध्यापक किसन वाबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.