सरकारकडे पाठपुराव्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना भिंगार राष्ट्रवादीचे निवेदन
भिंगार छावणी हद्दीतील जाचक अटी रद्द कराव्या किंवा महापालिका हद्दीत शहराचा समावेश करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वात मोठे सहकार क्षेत्राचे जाळे असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात सहकार विद्यापीठ स्थापन होण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी निवेदनाद्वारे केली. तर भिंगार छावणी हद्दीतील जाचक अटी रद्द व्हावे किंवा भिंगारचा तात्काळ महापालिका हद्दीत समावेश होण्याबाबत लक्ष वेधले.
रविवारी (दि.21 मे) माजी केंद्रीय मंत्री शरद पवार शहरात आले असता, सपकाळ यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मागणीचे निवेदन दिले. अहमदनगर जिल्हा राज्यात सर्वात मोठा जिल्हा असून, यामध्ये सहकार क्षेत्राचे मोठे जाळे आहे. सर्वात जास्त सहकार सहकारी साखर कारखाने आहेत. देशातील पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यात पद्मश्री स्व. विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरानगर येथे सुरु केला होता. आज जिल्ह्यात मोठ-मोठे सहकारी साखर कारखाने, मोठमोठ्या सहकारी बँका असून सहकाराचे जाळे फार मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. या जिल्ह्यात सहकार जिवंत ठेऊन वाढविण्यासाठी सहकार विद्यापीठाची आवश्यकता असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
तसेच रक्षा मंत्रालय येथून सर्व्हिस चार्ज थकित असून, निधी उपलब्ध नाही. कॅन्टोन्मेंट बोर्डातील कर्मचारी यांचे वेतन देखील मागील काही महिन्यापासून थकलेले आहे. निधी नसल्याने भिंगारचे प्रश्न सुटण्यास अवघड झाले आहे. चटई क्षेत्र असल्याने नागरिकांना तीन किंवा अधिक मजली इमारत बांधण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. अनेक नागरिक घरापासून वंचित असून, इमारत बांधण्याची परवानगी देखील मिळत नाही. अनेक जाचक अटींमुळे भिंगार शहराचा विकास खुंटला आहे. या जाचक अटी कमी होण्यासाठी किंवा भिंगार शहर महापालिकेत समाविष्ट होण्याबाबत सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी सपकाळ यांनी केली आहे.