• Fri. Jan 30th, 2026

जिल्हास्तरीय सब ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत 650 खेळाडूंचा सहभाग

ByMirror

Feb 9, 2023

गुणवंत मार्गदर्शक व खेळाडूंचा पुरस्काराने गौरव

खेळाची आवड निर्माण होण्याच्या दृष्टीकोनाने स्पर्धा आवश्यक -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलच्या मैदानावर जिल्हास्तरीय सब ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचा थरार रंगला होता. अहमदनगर जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत 650 खेळाडूंनी सहभाग नोंदवला.


वयोवर्ष 6, 8, 10, 12 व 14 या वयोगटातील मुला- मुलींसाठी धावणे, लांब उडी, गोळा फेक या क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. सुनील जाधव, सचिव दिनेश भालेराव, महात्मा फुले कृषी विद्यापीठचे क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड, व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव शैलेश गवळी, एल.बी म्हस्के आदी उपस्थित होते.


अहमदनगर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने या वर्षी पासून पहिला गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार भिंगार हायस्कूलचे रमेश वाघमारे यांना देण्यात आला. तसेच राष्ट्रीय खेळाडू श्रीनिवास कराळे यांना गुणवंत खेळाडू म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, लहान वयातच खेळाची आवड निर्माण होण्याच्या दृष्टीकोनाने स्पर्धा आवश्यक आहे. स्पर्धेतून उदयोन्मुख खेळाडू घडून जिल्ह्याचे नाव उंचावणार आहे. विद्यार्थ्यांचे शरीर स्वास्थ्य उत्तम रहावे व भावी पिढी मैदानाकडे वळावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अशा स्पर्धा नियमित भरविण्यात याव्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन, ट्रॅक रेसर्स स्पोर्टस फाऊंडेशन व सचिव दिनेश भालेराव यांनी क्रीडा मार्गदर्शक व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जे पुरस्कार सुरु केले, या पुरस्कारामुळे खेळाडू व मार्गदर्शक यांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे स्पष्ट केले.


या स्पर्धेला जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर, नगर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष महेंद्र हिंगे यांनी भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच म्हणून रमेश वाघमारे, राहुल काळे, संदीप घावटे, घनश्याम सानप, रावसाहेब मोरकर, विश्‍वेषा मिस्कीन, प्रतीक दळे, प्रशांत वाळुंज, महेश आनंदकर, अमित चव्हाण, गुलजार शेख, सुयोग शेळके, संतोष हराळ, अनिकेत कोळगे, करण काळे, आनंद काळे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *