आरोपी कुटुंबीयांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप
उल्हारे कुटुंबीयांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- जातीय अत्याचार केल्याप्रकरणी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपींची जामीनावर मुक्तता झाल्याने त्यांच्याकडून कुटुंबीयांच्या जिवीतास धोका निर्माण झाला असल्याची तक्रार नगर-कल्याण रोड शिवाजीनगर येथील फिर्यादी महिला मयुरी उल्हारे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी यमुना उल्हारे, पायल उल्हारे, ऋषिकेश उल्हारे आदी उपस्थित होते.
कोतवाली पोलीस स्टेशनला मयुरी उल्हारे यांच्या फिर्यादीवरुन जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी बाळू विधाते, मीना विधाते, युवराज विधाते, संतोष शिंदे यांच्यावर अॅट्रोसिटीसह इतर कलमान्वये 1 मे रोजी गुन्हा दाखल झाला होता. सर्व आरोपींना यामध्ये अटक होऊन त्यांना जामीन झाला असून, गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरुन सर्व आरोपींनी पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली आहे. कुटुंबातील सदस्यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी संबंधीत आरोपी देत असल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे.
आरोपींचे राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्यापासून जीवाला धोका निर्माण झाला आहे. कुटुंबातील सदस्यांच्या जीवाचे बरेवाईट झाल्यास त्याला सर्व संबंधित आरोपी जबाबदार राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भाऊ ऋषिकेश उल्हारे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असून, त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत सदर व्यक्ती असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सदरील आरोपींकडून पुन्हा अत्याचार सुरु करण्यात आले असून, त्यांच्यापासून संरक्षण करण्याची मागणी उल्हारे कुटुंबीयांनी केली आहे.