देश रक्षणाचे कर्तव्य बजावून माजी सैनिकांनी पर्यावरण रक्षणासाठी दिलेले योगदान प्रेरणादायी -माधवराव लामखडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने निंबळक (ता. नगर) येथे वृक्षारोपण करण्यात आले. गावातील स्मशानभूमी, जिल्हा परिषद शाळा व हायस्कूल परिसरात 51 वडाची झाडे लावण्यात आली. पावसाळा सुरु झाल्याने जय हिंद फाऊंडेशनने संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षरोपण मोहिम हाती घेतली असून, या उपक्रमातंर्गत ही झाडे लावण्यात आली.
जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या हस्ते झाड लावून वृक्षरोपण अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे सभापती डॉ. दिलीप पवार, ह.भ.प. अशोक नाथजी महाराज, सरपंच प्रियंका लामखडे, फाउंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, महादेव शिरसाठ, भगवान डोळे, भाऊसाहेब कर्पे, अशोक मोटे, दादाभाऊ बोरकर, सुभाष खामकर, निळकंठ उल्हारे, रवींद्र मांगडे, किसन भिंगारदिवे, उद्योजक बाळासाहेब साठे, सुभाष टांगळ, लेबर कॉन्ट्रॅक्टर अविनाश कोतकर, माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद लामखडे, प्रदीप कोरडे, विष्णू होळकर, स्वप्निल लोढा, उद्योजक अजय लामखडे, दत्ता धावडे, विष्णू लटके, सचिन पवार, लटके भगवान, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पोपट धामणे, सुखदेव पालवे, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.एस. कोतकर, बाळासाहेब कोतकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
माधवराव लामखडे म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिकांनी टाकलेले पाऊल दिशादर्शक आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी माजी सैनिक सरसावले असून, जिल्ह्यात वृक्षरोपण व संवर्धनाची चळवळीला गती आली आहे. मागील चार ते पाच वर्षापासून फाऊंडेशन सातत्याने वृक्षरोपण व संवर्धनासाठी योगदान देत असून, देश रक्षणाचे कर्तव्य बजावून माजी सैनिकांनी पर्यावरण रक्षणासाठी दिलेले योगदान प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
सरपंच प्रियंका लामखडे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपणाशिवाय पर्याय नसून, या सर्व झाडांची काळजी ग्रामस्थ व ग्रामपंचायत घेणार असल्याचे स्पष्ट केले. डॉ. दिलीप पवार यांनी वृक्षरोपण व संवर्धन ही चळवळ फक्त शासनापुरती मर्यादीत न राहता यामध्ये सर्व जबाबदार नागरिकांनी योगदान देण्याची गरज आहे. वृक्षरोपण व संवर्धनासाठी माजी सैनिक देत असलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी पालवे यांनी आजी-माजी सैनिक व वीर जवानच्या कुटुंबीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी जय हिंद फाऊंडेशनचे कार्य सुरु आहे. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनासाठी फाऊंडेशन योगदान देऊन जिल्ह्यातील डोंगर, टेकड्या हिरवाईने फुलविण्याचे कार्य वर्षभर केले जात असल्याची माहिती दिली.