वृक्ष फेरीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची जागृती करुन गावोगावी राबविले वृक्षरोपण
पर्यावरण रक्षणासाठी माजी सैनिकांनी टाकलेले पाऊल क्रांतिकारक -पद्मश्री पोपट पवार
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सातत्याने वृक्षरोपण व संवर्धनाची चळवळ चालविणाऱ्या जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने राष्ट्रीय वृक्ष वटवृक्ष, एक गाव एक वड! अभियानाची सुरुवात करण्यात आली. शहरातील दिल्लीगेट येथे पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते या अभियानातंर्गत फिरते रथासह निघालेल्या वृक्ष फेरीचे उद्घाटन करुन अभियानाचे प्रारंभ करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, महादेव शिरसाठ, रोहिदास पालवे, अशोक मुठे, दादाभाऊ बोरकर, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ औटी, प्रदीप टेमकर, नंदूभाऊ पालवे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात शिवाजी पालवे म्हणाले की, पहिल्या टप्प्यात 30 गावांना एक वडाचे व इतर दहा झाडे देऊन त्याची तेथील माजी सैनिकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लागवड करण्यात येणार आहे. 20 ते 22 फुट उंच असलेली झाडे फिरत्या रथाद्वारे गावोगावी घेऊन जावून ग्रामस्थांमध्ये देखील वृक्षरोपण व संवर्धनाची जागृती केली जाणार आहे. तिरंगा ध्वजाने सजवलेल्या या वृक्ष फेरीसाठी तीस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

पोपट पवार म्हणाले की, पर्यावरण रक्षणासाठी माजी सैनिकांनी टाकलेले पाऊल क्रांतिकारक ठरणार आहे. जय हिंदच्या माध्यमातून सुरु झालेल्या या अभियानाचा वटवृक्ष निश्चित बहरणार असून, याचा फायदा पर्यावरणाला होणार आहे. भविष्यातील भिषण संकट ओळखून माजी सैनिकांनी पर्यावरणाच्या प्रश्नावर सुरु असलेला लढा दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
या वृक्ष फेरीचे स्वागत वन विभागाच्या जिल्हा वन संरक्षण अधिकारी सुवर्णाताई माने यांनी स्वागत करून कौतुक केले. वसंत टेकडी या ठिकाणी नगरसेवक सुनील त्र्यंबके, निखिल वारे, विनीत पाऊलबुद्धे, बाळासाहेब पवार यांनी वृक्ष फेरीचे स्वागत केले. तर यामध्ये सहभागी असलेल्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.
शेंडी या ठिकाणी बाजार समितीचे संचालक बापूसाहेब घोरपडे यांनी देखील उत्साहात स्वागत केले. त्यानंतर ही वृक्ष फेरी जेऊर मार्गे उदरमल येथे ग्रामपंचायतच्या ठिकाणी दाखल झाली. यावेळी ग्रामस्थांमध्ये वृक्षरोपण व पर्यावरण संवर्धनाची माहिती देण्यात आली. कोल्हार गावानंतर चिचोंडी येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीच्या माध्यमातून ग्रामपंचायतांना एक वडाचे व इतर दहा झाडे देण्यात आले. तर काही ठिकाणी वृक्षरोपण देखील करण्यात आले.
समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी ह.भ.प. गंगाधर महाराज गाडेकर, श्रीराम देवस्थानचे केशव शिंगवे, हरेश्वर देवस्थानचे ह.भ.प. भगवान बाबा मचे महाराज, माजी पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर, आनंद विद्यालयाचे प्राचार्य सुभाष खेडकर, शर्माभाऊ पालवे, विठ्ठलराव पालवे, जांबुवंत पालवे, आजिनाथ पालवे, पालवे सर, आबा गरुड, आनंदराव शिरसाट, पांडुरंग गिते, तुळशीराम पालवे, पांडुरंग पालवे, आनंद विद्यालयाचे सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आनंद विद्यालयात वडाच्या झाडांची लागवड करुन या वृक्ष फेरीची सांगता झाली.
