कुस्ती क्षेत्रात लोंढे कुटुंबीयांचे नेहमीच मार्गदर्शन व योगदान मिळाले – पै. रेश्मा माने
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या छत्रपती शिवराय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू रेश्मा माने हिने महिलांच्या खुल्या गटात विजयी होऊन मानाची चांदीची गदा पटकाविल्याबद्दल लोंढे परिवाराच्या वतीने तिचा पैलवान संभाजी लोंढे यांनी सत्कार करुन वैयक्तिक रोख बक्षिस दिले. यावेळी प्रशिक्षक पैलवान राजू साळुंके, सचिन माने, रुपाली माने, ऋषीकेश माने, ऋतूजा लोंढे, शिवाजी ठाणगे, राजू शिंदे, अभिजीत नलगे, गोविंद शिंदे आदी उपस्थित होते.
पैलवान संभाजी लोंढे म्हणाले की, महिला कुस्तीपटू रेश्मा माने ही महाराष्ट्राची भूषण आहे. सतरा आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा खेळून अनेक पदके मिळवली आहेत. शिवछत्रपती पुरस्काराने देखील राज्य सरकारने तिला गौरवले असून, राष्ट्रकुल स्पर्धेते तिने सुवर्ण पदक देखील मिळवले आहे. तिच्याकडून ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारताला मोठ्या अपेक्षा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना पै. रेश्मा माने हिने कुस्ती क्षेत्रात लोंढे कुटुंबीयांचे नेहमीच मार्गदर्शन व योगदान मिळाले. अहमदनगरला सन 2011 पासून कुस्ती खेळण्यास येत असताना, नेहमीच लोंढे कुटुंबीयांनी साथ दिली. अधिक वजन असलेल्या समोरच्या कुस्तीपटूला अनुभवाच्या जोरावर मात देऊन ही कुस्ती जिंकल्याची भावना तिने व्यक्त केली.