अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील पारधी समाजाच्या सुशिक्षित युवकांची हजेरी
मल्टीनॅशनल कंपन्यांनी तरुणांना दिले लाखो रुपयांचे पॅकेज
अहमदनगर (प्रतिनिधी)- माणूस हा जन्मतः गुन्हेगार नसतो, त्याची गुन्हेगारी परिस्थितीवर अवलंबून असते. समाज सुरक्षित ठेवायचा असेल तर, ज्या उपद्रवी घटकांपासून धोका आहे त्यांचा प्रथम विचार केला गेला पाहिजे. एका माणसाला नोकरी मिळाली तर, त्याचे कुटुंब सुधारते. गुन्हेगारीचा ठसा पुसण्यासाठी पारधी समाजातील तरुणांना रोजगार शिवाय पर्याय नाही. समाज परिवर्तनासाठी प्रामाणिक हेतूने सामाजिक जाणीव व संवेदना ठेऊन पोलीस दलाने या रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याचे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी केले.

अहमदनगर जिल्हा पोलीस दलातर्फे शहरातील पेमराज सारडा महाविद्यालयात सध्या कार्यरत व सेवानिवृत्त झालेले पोलिस अधिकारी, अंमलदार, होमगार्ड यांच्या पाल्यांसाठी तसेच पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पारधी समाजातील ज्येष्ठ लेखक नामदेव भोसले, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके, प्रकाश पाटील, महेंद्र कुलकर्णी, अनिरुध्द देवचक्के, विजयसिंह होलम, मोहनीराज लहाडे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र काळे, मधुसूदन सारडा आदींसह विविध मल्टीनॅशनल कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पुढे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर म्हणाले की, अन्न, वस्त्र, निवारा या तीन मनुष्याच्या मुलभूत गरजांचे प्रश्न रोजगारातून सुटत असते. रोजगार उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे कार्य पोलीस दलाने केले आहे. पारधी समाजातील युवकांनी नोकरीमधून समाज परिवर्तन घडवून गुन्हेगारीचा ठपका दूर करावा. इतिहासात होऊन गेलेल्या अनेक राजा-महाराजांनी अस्पृश्यता पाळली नाही. त्यांनी प्रत्येक समाजाला त्यांच्या कौशल्यानुसार कामे दिली. ज्या समाजाला गुन्हेगार समजले जाते, त्यांना अंगरक्षक ही ठेवले. कोणतेही कार्य छोटे नसते, ते प्रमाणिकपणे केल्याने यश मिळते. स्वतःचा स्वाभिमान बाळगा, आत्मविश्वास ठेवा, मुलांना उच्च शिक्षित करण्याचा संदेश त्यांनी दिला. रोजगार मेळाव्यातून मिळालेली नोकरी टिकून करण्याचे त्यांनी आवाहन केले. तर मनाला भिडणार्या कविता सादर केल्या.

उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन झाले. तर संवाद पुस्तिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. या रोजगार मेळाव्यास सेवानिवृत्त झालेले पोलिस अधिकारी, अंमलदार, होमगार्ड तसेच पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. संपूर्ण महाराष्ट्रातून पारधी समाजातील तरुण रोजगार मेळाव्यासाठी हजर झाले होते. तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी 60 ते 70 मल्टीनॅशनल कंपन्यांनी युवकांच्या मुलाखती घेतल्या. लाखो रुपयांचे पॅकेज असलेले नोकर्यांचे नियुक्तीचे पत्र उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते युवकांना प्रदान करण्यात आले.

प्रास्ताविकात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले की, आजी-माजी पोलीस व पारधी समाजातील बेरोजगार युवकांना नोकरीच्या प्रश्नातून ही रोजगार मेळाव्याची संकल्पना पुढे आली. गुन्हेगारांना शिक्षा देऊन व जेलमध्ये टाकून गुन्हेगारी संपणार नाही. या दुष्टचक्रातून त्यांना बाहेर काढण्यासाठी परिस्थिती बदलण्याची गरज आहे. ही परिस्थिती रोजगारातून बदलणार असून, पारधी समाज गुन्हेगारीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडणार आहे. यामुळे पोलिसांचा गुन्हेगारी कमी करण्याचा मुख्य उद्देश्य सफल होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर आदिवासी-पारधी समाजाच्या भाषेतून त्यांनी युवकांना साद घातली.

अनिरुद्ध देवचक्के यांनी कंपन्यांना लागणारे स्किलची उणीव रोजगार मिळव्यातून दूर होणार आहे. कंपनींना योग्य कामगार व उमेदवारांना देखील योग्य रोजगार मिळणार असल्याचे सांगितले. सुभाष गुंदेचा यांनी बेरोजगार युवकांना नोकरी देण्याचा पोलिसांचा उपक्रम स्तुत्य आहे. गुन्हेगार संपवण्यापेक्षा, त्यामागील गुन्हेगारी प्रवृत्ती संपवण्याचे कौतुकास्पद कार्य पोलीस प्रशासन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
सुधीर लंके म्हणाले की, ज्या समाजावर गुन्हेगारीचा शिक्का बसला, अशा समाजातील तरुणांना जीवनात उभे करण्यासाठी पोलीस दलाने हा मेळावा घेतला आहे. पारधी समाजाला गुन्हेगारीकडे वळण्यास प्रवृत्त करणारी निर्माण केली गेलेली परिस्थिती देखील तेवढीच जबाबदार आहे. त्यांना मनुष्य म्हणून वागणूक देण्याची गरज आहे. पोलिसांनी गुन्हे घडू नये, गुन्हा करणार्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त करुन तो समाजात कसा उभा राहील याकडे पोलीस दलाने दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. राजर्षी शाहू महाराजांचा उदात्त दृष्टिकोन ठेवून पोलीस दलाने समाजाने झुगारलेल्यांना आपलेसे केले. पारधी समाजाला रोजगार मिळाल्यास तरुण नवी उभारी घेऊन गुन्हेगारीपासून दूर होणार आहे. हा रोजगार मेळाव्याचा मॉडेल म्हणून महाराष्ट्र पुढे येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळी 9 वाजल्यापासून रोजगार मेळाव्यास सुरुवात झाली होती. पारधी समाजाला गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी पोलीस दलाचा हा उपक्रम सर्वांनाच भावला. तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असताना पारधी समाजातील युवक सुशिक्षित असूनही, रोजगार नसल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात. अशा तरुणांना रोजगार दिल्यास समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट होण्यासाठी त्यांना रोजगार मेळाव्यात सामावून घेण्यात आले होते. रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न धुमाल यांनी केले. आभार अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी मानले.