सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण
शासनाकडून अहवाल प्राप्त असून, देखील हजर करून घेतले जात नसल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- पोलीस दलात कार्यरत असलेले वडिल व सेवानिवृत्त आईचे कोरोनामध्ये निधन झाले असताना, वडिलांच्या जागेवर लहान भावाला अनुकंपा तत्वावर हजर करून न घेतल्यामुळे सोमवार दि. 15 मे पासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा गणेश केदारे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे दिला आहे.
पोलीस दलात कार्यरत असलेले विठ्ठल केदारे व सेवानिवृत्त झालेल्या आईचे एप्रिल 2021 मध्ये कोरोना महामारीत निधन झाले. पोलीस अधीक्षक कार्यालयातील आस्थापना विभागातील कर्मचारी व हेड क्लार्क यांच्या सोबत नोकरी संदर्भात 2018 साली झालेल्या वाद व सुनावणी झाल्यानंतर केलेल्या पैशाची मागणी पूर्ण न केल्याने अनुकंपा तत्वावर हजर करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप केदारे यांनी केला आहे.
लहान भाऊ विक्रम विठ्ठल केदारे याचा विनंती अर्ज शासनास पाठविण्यात आलेला आहे. शासनाकडून अहवाल प्राप्त झालेला असून, सुद्धा पोलीस दलात त्याला हजर करून घेतले जात नाही. दोन्ही भाऊ बेरोजगार असल्यामुळे आजीचा वैद्यकिय खर्च व कुटुंब चालविण्यासाठी काहीही साधन उपलब्ध नसून, आई-वडील राहिले नसल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी लहान भाऊ विक्रम केदारे याला पोलीस सेवेत घेण्याची मागणी करण्यात आली आहे.