राष्ट्र निर्माण पार्टीची पत्रकार परिषदेत घोषणा
हिंदुत्ववादी म्हणून घेणार्या राजकीय पक्षांकडून हिंदूंचा विश्वासघात होत असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- राजकारणात प्रभू श्री रामचंद्रांचे नाव घेऊन बहुजनांची दिशाभूल करून हिंदुत्वाचे राजकारण काही पक्षांच्या माध्यमातून सुरू आहे. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणार्या राजकीय पक्षांकडून हिंदूंच्या होत असलेल्या विश्वासघाताबद्दल हिंदूंवर होणारे अन्यायाचा बिमोड करण्यासाठी व राष्ट्रहित सर्वपरी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अहमदनगर जिल्ह्यातील विविध निवडणुकांमध्ये कट्टर हिंदुत्व नेते उभे करून यापुढील सर्व निवडणुका लढवल्या जाणार असल्याची घोषणा राष्ट्र निर्माण पार्टीचे जिल्हाध्यक्ष उत्कर्ष गीते यांनी पत्रकार परिषदेत केली.
शहरातील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदप्रसंगी शहर संघटक नील गांधी, जिल्हा संघटक वैभव सलगरे, संभाजी निंबाळकर, राजेंद्र गीते, मुकेश थदानी, अभिजीत भवरे, ओमकार पेटकर, किरण रोकडे, निरंजन पाठक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे गीते म्हणाले की, 2014 नंतर भारतात राजकीय दृष्ट्या बदल होऊनही हिंदूंची परिस्थिती न सुधारता अत्यंत दयनीय झालेली दिसते. गेल्या 70 वर्षात काँग्रेस व इतर पक्षाकडून भारतातला बहुसंख्य हिंदू हा भरडला गेला आहे. 370 कायदा, राम मंदिर आणि आता समान नागरी कायदा अशा देशाची कामे दर पाच वर्षाला एक आणि ते सुद्धा निवडणूक जवळ आल्यावर हिंदू मतपेटीसाठी केले जात आहे. यावरुन भाजप हा हिंदुत्ववादी नसून, फक्त मतपेटीसाठी हिंदूंचा वापर करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्रातील गलिच्छ राजकारण फक्त सत्तेसाठी सुरु आहे. विविध ठिकाणी झालेल्या हिंदूंच्या हत्या, दिल्लीमध्ये सीए एनआरसीच्या विरोधात प्रदर्शनामध्ये मारले गेलेले हिंदू, लव्ह जिहाद मध्ये बळी पडत असलेल्या माता-भगिनी, नुपूर शर्माचे स्टेटस लावल्यामुळे मुंडके कापलेले हिंदू यांना न्याय कधी मिळणार? हा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
भाजप स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणून घेते, पण हिंदू हिताच्या गोष्टी करणार्या व प्रतिकारक उत्तर देणार्या नुपूर शर्मा व टी. राजासिंग सारख्या प्रवक्त्यांना पार्टीतून काढले जाते. हिंदूच्या द्वेषाला खतपाणी घालणार्या लोकांसोबत युती करणार्या भाजपला हिंदूनी बायकॉट करण्याची गरज आहे. हिंदूच्या प्रश्नांवर काम करणारा एकही राजकीय पक्ष दिसत नाही. यासाठी एक प्रयत्न म्हणून राष्ट्र निर्माण पार्टीची मुहुर्तमेढ रोवण्यात आली असून, हिंदू हितासाठी लढणारा राजकीय पक्ष पर्याय म्हणून पुढे आला असल्याचेही गीते यांनी सांगितले.
राष्ट्र निर्माण पार्टीच्या माध्यमातून हिंदुत्ववादी युवकांना तसेच सेवानिवृत्ती लष्करी अधिकारी, न्यायाधीश, शिक्षक वृंद, सरकारी निमसरकारी, निवृत्त अधिकारी यांना एकत्र करुन पक्षाची वाटचाल हिंदुत्ववादी विचाराने केली जाणार आहे. तर हिंदूंचे एकत्रीकरण करून जन आंदोलन उभारण्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.