• Fri. Mar 14th, 2025

एमआयडीसीचा भाजी बाजार बनलाय मृत्यूचा सापळा

ByMirror

May 31, 2023

रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना मागे सरकविण्यासाठी व स्वच्छतेसाठी सहकार्याची मागणी

पोलीस प्रशासन आडकाठी आणत असल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर, एमआयडीसी हद्दीतील नगर-मनमाड महामार्गावर बसणार्‍या भाजी विक्रेत्यांना मागे सरकविण्यासाठी व परिसराची स्वच्छता करण्यासाठी पोलीस प्रशासनाचे सहकार्याची मागणी भाजपा अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा तथा नागापूर भाजीपाला मटन मासे व्यापारी असोसिएशनच्या सचिव शारदा गायकवाड यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


भाजी विक्रेत्यांना मार्केटमध्ये मागे सरकवून बसविण्यासाठी योग्य ती फी भरून पोलीस बंदोबस्त मिळावा व मार्केट मधील परिसराची स्वच्छता करुन सोयी-सुविधा निर्माण करुन देण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून देणगी जमा केल्यास खंडणी यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याची धमकी एमआयडीसीचे पोलीस स्टेशनचे अधिकारी करत असल्याचा आरोप करुन त्यांचे निलंबन करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.


एमआयडीसी येथील सनफार्मा चौक ते सह्याद्री चौक तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशन पर्यंत रस्त्याच्या कडेला भाजी व फळ तसेच मटण- मच्छी बाजार भरत आहे. मात्र प्रत्येक विक्रेता जास्त ग्राहक आपल्यापर्यंत कसे पोहचतील या अपेक्षेने थेट रस्त्यावरच्या जागेची निवड करून तेथे भाजीपाला विक्री व टपर्‍यांचे अतिक्रमण करुन दुकाने थाटण्यात आली आहे. यामुळे वाहतुकीस कोंडी निर्माण होऊन अपघातांना निमंत्रण मिळत आहे. तर अनेक लहान-मोठे अपघात घडत असून, येथे खरेदीला आलेला ग्राहक वर्ग देखील रस्त्यावर वाहने लावतात किंवा गाडीवर बसल्या-बसल्या भाजी व इतर साहित्य खरेदी करतात. या बेशिस्तीमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.


या संदर्भात नागापूर भाजीपाला मटन मासे व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून एमआयडीसी, पोलीस व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून रस्त्यावर बसणार्‍या भाजी विक्रेत्यांना मागे सरकविण्याची मागणी करुन उपोषण करण्यात आले होते. याची दखल घेऊन एमआयडीसी पोलीसांनी फक्त एक दिवस भाजी विक्रेत्यांना मागे सरकविण्याची कारवाई केली. मात्र काही दिवसातच भाजी विक्रेते पुन्हा रस्त्यावर आले असल्याचे असोसिएशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


नागापूर भाजीपाला मटन मासे व्यापारी असोसिएशनने पुढाकार घेऊन मोकळ्या जागेची जेसीबीद्वारे स्वच्छता करुन भाजी विक्रेत्यांना रस्त्यावरुन उठवून स्वच्छ केलेल्या जागेत बसवले आहे. मात्र मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते रस्त्यावर असून, त्यांना रस्त्याच्या कडेला उपलब्ध असलेल्या जागेची स्वच्छता करुन दिल्यास वाहतुक कोंडीचा व धोकादायक बाजाराचा प्रश्‍न सुटणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या भागातील स्वच्छतेसाठी लागणारा खर्च भाजी विक्रेत्यांच्या लोकवर्गणीतून नियोजन करण्यात आले आहे. मात्र याला एमआयडीसी पोलीस प्रशासनाचा विरोध आहे. पोलीस निरीक्षक, ठाणे अंमलदार खंडणी यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहेत. अशाच प्रकारे माझे पती अंतोन गायकवाड यांनी येथील अवैध धंद्याविरोधात आवाज उठविल्याने मागील गुन्हे पुढे करुन त्याला हद्दपार करण्यात आले. भाजी विक्रेत्यांना मागेही सरकवता येई ना, असोसिएशनने पुढाकार घेऊन परिसराची स्वच्छता मोहिम व भाजी विक्रेत्यांना मागे सरकवून बसविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याकडून सहकार्य देखील मिळत नसून, उलट त्याला विरोध करुन गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचे शारदा गायकवाड यांनी म्हंटले आहे. सदर मागणीची दखल न घेतल्यास 13 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *