• Sat. Mar 15th, 2025

एमआयडीसीचा भाजी बाजार आला पुन्हा रस्त्यावर

ByMirror

Mar 3, 2023

मागील आठवड्याच्या कारवाईनंतर पुन्हा जैसे थी परिस्थिती

अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील आठवड्यात एमआयडीसी पोलीसांनी नवनागापूर, एमआयडीसी हद्दीतील नगर-मनमाड महामार्गावर बसणारे भाजी विक्रेते, थाटण्यात आलेले विविध दुकानांचे हटविलेले अतिक्रमण पुन्हा रस्त्यावर थाटण्यात आले आहेत. नगर-मनमाड महामार्गाच्या रस्त्यावर भरणारा हा धोकादायक बाजार नागरिकांच्या जीवावर उठला असून, एखादी मोठी दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झालेला आहे.


काही दिवसांपूर्वी सदर अतिक्रमण हटवून विक्रेत्यांना रस्त्याच्या मागे सरकून बसविण्यासाठी भाजपा अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा शारदा गायकवाड व नागापूर भाजीपाला मटन मासे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अंतोन गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण केले होते. या मागणीची दखल घेऊन एमआयडीसी पोलीसांनी मागील अठवड्यात कारवाई करुन रस्त्यावर आलेले भाजी विक्रेते व इतर व्यावसायिकांना लावलेली दुकान हटविली होती.


एमआयडीसी येथील सनफार्मा चौक ते सह्याद्री चौक तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशन पर्यंत रस्त्याच्या कडेला भाजी व फळ तसेच मटण- मच्छी बाजार भरत असतो. प्रत्येक विक्रेता जास्त ग्राहक आपल्यापर्यंत कसे पोहचतील या अपेक्षेने थेट रस्त्यावरच्या जागेची निवड करून तेथे भाजीपाला विक्री व टपर्‍यांचे अतिक्रमण करत आहे. नागरिकांना जीव मुठीत धरुन या भागातून जावे लागत आहे. या बाजारमुळे वाहतुक कोंडी व लहान-मोठे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. येथे खरेदीला आलेला ग्राहक वर्ग देखील रस्त्यावर वाहने लावतात किंवा गाडीवर बसल्या-बसल्या भाजी व इतर साहित्य खरेदी करतात.

या बेशिस्तीमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या बाजाराला शिस्त लावण्यासाठी एमआयडीसी पोलीस प्रशासन व एमआयडीसी व्यवस्थापनाने ठोस पाऊले उचलून रस्त्यावर बसणार्‍या भाजी, फळ विक्रेते व टपर्‍यांचे अतिक्रमण मागे सरकवून घेण्यासाठी मोहिम हाती घेण्याची मागणी नागापूर भाजीपाला मटन मासे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अंतोन गायकवाड यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *