शहरातील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने
केंद्र सरकार राजकीय द्वेषातून विरोधी पक्षातील मंत्री व राजकीय पुढारींवर ईडीद्वारे कारवाई करत असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्या केंद्रीय पथकाने सूडबुद्धीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शहरातील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. तर जिल्हाधिकारी कार्यालया समोर या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
केंद्र सरकार राजकीय द्वेषातून विरोधी पक्षातील मंत्री व राजकीय पुढारींवर कारवाई करत असल्याचा आरोप करुन, मलिक यांच्यावर ईडीने केलेली बेकायदेशीर कारवाई मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना दिले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, कामगार सेलचे गजानन भांडवलकर, अर्बन सेलचे प्रा. अरविंद शिंदे, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, युवती शहराध्यक्षा अंजली आव्हाड, प्रदेश सरचिटणीस अशोक बाबर, फारुक रंगरेज, उपाध्यक्ष मुन्नाशेठ चमडेवाले, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश महासचिव अथर खान, जिल्हाध्यक्ष सय्यद गालीब अली, अब्दुल रऊफ खोकर, उपाध्यक्ष अनिकेत राठोड, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अमोल कांडेकर, सरचिटणीस गणेश बोरुडे, युवक उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, विशाल बेलपवार, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, सारिका गुगळे, लहू कराळे, माजी नगरसेवक गौतम भांबळ, अमोल शिंदे, राम चव्हाण, अक्षय चव्हाण, तौफिक पटेल, बाळू काळे, सावता चव्हाण, राजू कोकणे, किरण पंधाडे, हाजी लाला खान, राम पिंपळे, विनोद खैरे, सुदर्शन ढवळे, अभिजित खरपुडे, मिलिंद शिंदे आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
बुधवारी (दि.23 फेब्रुवारी) पहाटे ईडीच्या केंद्रीय पथकाने महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांना पूर्वसूचना न देता चौकशीसाठी ताब्यात घेतले व नंतर अटक केली. या बेकायदेशीर कारवाईमुळे राज्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. ही कारवाई लोकतंत्राच्या विरोधात असून, लोकशाहीचे खच्चीकरण करणारी आहे. केंद्र सरकार विरोधी पक्षातील मंत्री व पुढार्यांना ईडीला हाताशी धरुन सूडबुद्धीने टार्गेट करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मंत्री नवाब मलिक यांच्यावर झालेली ईडीची कारवाई बेकायदेशीर असून, ही कारवाई मागे घ्यावी, केंद्र सरकार ईडीला हाताशी धरुन सूडभावनेने विरोधी पक्षातील नेत्यांवर करत असलेल्या कारवाईचे सत्र थांबविण्याची मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे.