आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये 810 रुग्णांची मोफत नेत्र रोग तपासणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटलने सेवाभाववृत्तीने आरोग्य सेवेची मशाल प्रज्वलीत केली. जिल्ह्यासह राज्यातील अनेक गरजू घटक आनंदऋषी म.सा. यांच्या स्मृतीदिनानिमित्त होणार्या मोफत शिबीरांची वाट पहातात. या शिबीरांमुळे गरजू घटकांना मोठा आधार मिळाला आहे. डोळा हा शरीरातील महत्वाचा अवयव असून, त्यामुळे जीवनाचा आनंद घेता येतो. दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींच्या जीवनात प्रकाश निर्माण करुन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचेकार्य आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी केले. तर या सेवाभावी कार्यास महापालिका आरोग्य विभागाचे नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे स्पष्ट केले.
राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या 30 व्या स्मृतीदिनानिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये डॉ. प्रकाश कांकरिया व सुधा कांकरिया यांच्या सहकार्याने आयोजित मोफत नेत्र रोग तपासणी शिबीराचे उद्घाटनप्रसंगी डॉ. राजूरकर बोलत होते. यावेळी साई सूर्य नेत्रसेवाचे डॉ. प्रकाश कांकरिया, रत्नप्रभा छाजेड, वैद्यकिय संचालक अशोक महाडिक, नेत्रालय विभागाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. आनंद छाजेड, डॉ. कौस्तुभ घोडके, डॉ. आदित्य नाकाडे, डॉ. सचिन कसबे, डॉ. श्रृती थोपटे, डॉ. पियुष सोमानी, सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंगवी, संतोष बोथरा, प्रकाश छल्लानी आदींसह जैन सोशल फेडरेशनचे सदस्य उपस्थित होते.
प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, आनंदऋषीजी नेत्रालय विभागात सर्व तज्ञ डॉक्टरांकडून नेत्र शस्त्रक्रिया होत असून, पाच ते दहा वर्षाचा अनुभव असलेले व हजारो शस्त्रक्रिया करणारे तज्ञ डॉक्टर सेवा देतात. हे या हॉस्पिटलचे वैशिष्टये आहे. या नेत्रालय विभागाच्या माध्यमातून 33 हजार पेक्षा जास्त रुग्णांवर मोतीबिंदू, काचबिंदू व इतर डोळ्यांचे अवघड शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली अद्यावत नेत्रालय विभाग सज्ज आहे. या सेवेत महाडिक यांचे योगदान मिळत असून, 125 लोकांची टीम सेवा देत आहे. या सेवेच्या माध्यमातून लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झाला असून, उत्तम सेवा देण्यासाठी आनंदऋषीजी नेत्रालय विभाग कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तर गावोगावी व वाडी-वस्तीवर जाऊन रुग्णसेवेचे व्रत जोपासले जात आहे. पुढील पाच वर्षात नगर-बीड जिल्ह्यात गरजू घटकातील एकही दृष्टीदोष असलेला रुग्ण राहणार नसल्याचा संकल्प घेऊन कार्य सुरु असल्याचे स्पष्ट केले.
डॉ. प्रकाश कांकरिया म्हणाले की, समाजाची गरज ओळखून आनंदऋषीजी हॉस्पिटल रुपाने आरोग्य मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे. हॉस्पिटलमध्ये हृदय व नेत्रासंबंधी सर्व शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात करण्यात येतात. नेत्रालयाचा स्वतंत्र अद्यावत विभाग सेवेसाठी सज्ज करण्यात आला आहे. या विभागाच्या माध्यमातून सर्व टीम मनोभावे सेवा देत असून, दर महिन्याला एक हजार पेक्षा जास्त रुग्णांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. ज्या घटकांना मोफत सुविधा दिली जाते, त्यांनी देखील सामाजिक दृष्टीची जाणीव ठेवून नेत्रदान करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले. आज हजारो दृष्टीहीन बांधव डोळ्यांच्या प्रतिक्षेत आहे. नेत्रदानाचे प्रमाण कमी असल्याने भारतात डोळ्यांचा मोठा तुटवडा आहे. भारतीय संस्कृतीत दानाला महत्त्व असून, अमूल्य डोळ्यांचे मरणोत्तर दान करण्याचे तसेच देहदानाचा संकल्प करावा. हीच आनंदऋषीजी म.सा. यांना खरी आदरांजली ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या शिबीरात 810 रुग्णांची मोतिबिंदू, रेटिना आदी डोळ्यांच्या विकारांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. शिबीराच्या माध्यमातून मोतिबिंदू, रेटिना, तिरळेपणा व लहान मुलांचे मोतिबिंदू शस्त्रक्रिया अत्यल्पदरात होणार आहे. तसेच या शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत मोफत केल्या जाणार आहेत. उपस्थितांचे आभार प्रकाश छल्लानी यांनी मानले. शिबीर यशस्वी करण्यासाठी जैन सोशल फेडरेशनचे सदस्य व आनंदऋषीजी हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.