चांदबीबी महालावर पार पडले ट्रेकेथॉन
अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्वत, डोंगररांगाचे जैवविविधता, निसर्ग सौदर्य जपण्याचा व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अहमदनगर सायकलिंग क्लब व ट्रेक कॅम्प टीमच्या वतीने आतंरराष्ट्रीय पर्वत दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. चांदबीबी महालावर आयोजन करण्यात आलेल्या ट्रेकेथॉनमध्ये श्री सांदीपनी अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवून ट्रेकिंगचा आनंद लुटला.
पहाटे 5 वाजता कुडकुडणार्या थंडीत आगडगाव (ता. नगर) येथून या ट्रेकिंगची सुरुवात झाली. चांदबीबी महालापर्यंतचा 8 कि.मी. चे अंतर ट्रेकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी, युवक-युवती व नागरिकांनी पूर्ण केले. यावेळी अहमदनगर सायकलिंग क्लबचे अध्यक्ष गौरव फिरोदिया, मेहेर तिवारी, ट्रेक कॅम्पचे अध्यक्ष विशाल लाहोटी, सांदीपनी अॅकॅडमीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर फंड आदी उपस्थित होते.
ट्रेकेथॉनचे उत्तम नियोजन व सहभागी झालेल्यांची व्यवस्थितपणे एनर्जी ड्रिंक व पाण्याची सोय करण्यात आली होती. सहभागी होऊन ट्रेकिंग पूर्ण केलेल्यांना मेडल देण्यात आले. यामध्ये शहरातील पाचशे ते सहाशे नागरिकांनी सहभाग नोंदविला.

पर्यावरणावर आणि लोकांच्या जीवनावर पर्वतांचा प्रभाव मोठा असतो. या प्रदेशाची एक वेगळी निसर्गसंपदा आणि जैवविविधता असते. त्याच्या संरक्षणासाठी व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक करुन अॅकॅडमीचे संचालक के. बालराजू यांनी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

