अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
मुलीचा शोध न लागल्यास पिडीत कुटुंबीयांसह पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषणाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणार्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्याच्या मागणीचे निवेदन अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पिडीत कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षकांना दिले. सदर प्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुलीला पळविणार्या विरोधात गुन्हा दाखल केला जात नसल्याचे पिडीत कुटुंबीयांची तक्रार आहे.
पारनेर तालुक्यातील एका गावात 4 एप्रिल रोजी एका अल्पवयीन मुलीला शाळेतून फूस लावून पळविण्यात आले. याबाबत पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या कुटुंबीयांना त्या गावातील एका व्यक्तीविरोधात संशय असून, त्या व्यक्तीविरोधात व मुलीला पळवून नेण्यास सहाय्य करणार्या त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती व पिडीत कुटुंबीयांनी सोमवारी (दि.18 एप्रिल) निवेदन दिले. मुलीला पळवून नेणारा व्यक्ती मुलगी आमच्या कडे असून, लग्न लावून देण्यास तयार असाल तर मुलीला घरी आणून सोडतो असे सांगतो. या प्रकरणी पोलीसांना कल्पना देऊनही आरोपींवर गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. दहा दिवसाच्या आत मुलगी घरी परत न आल्यास तसेच या प्रकरणातील आरोपीवर गुन्हा दाखल न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालया समोर पिडीत कुटुंबीयांसह आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.