• Thu. Mar 12th, 2026

अल्पवयीन मुलीचे लग्न लावणार्‍या कुटुंबीयांवर गुन्हे दाखल व्हावे

ByMirror

Nov 18, 2022

जामखेडला अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याचा आरोप

रिपाई अल्पसंख्यांक आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याबद्दल मुली व मुलाकडील कुटुंबीयांवर पोक्सो कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) अल्पसंख्यांक आघाडीचे जामखेड तालुकाध्यक्ष आदिल शेख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


जामखेड येथील साई मंगल कार्यालयात 29 ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्यात आले होते. सदर मुलीचे वय लग्नावेळी 17 वर्षे 8 महिने होते. तिला बालिका होण्यासाठी अजून चार महिने बाकी होते. याची सर्व माहिती तिच्या घरच्यांना व तिच्या पतीच्या घरच्यांना होती. तरी देखील सदर मुलीचे लग्न लावण्यात आले.


अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्याचे प्रमाण वाढत आहे. याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत असून, यामुळे कित्येक नाबालिक मुली मृत्यूच्या दाढेत ओढल्या जात आहे. शरीराची परिपक्वता न झाल्याने गरोदर राहिल्यास त्यांच्या व मुलांच्या जीविताला मोठा धोका निर्माण होतो. वय कमी असल्याने कुटुंब चालविण्याचा अनुभव नसल्याने घटस्फोट होण्याचे प्रमाणही वाढत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


जामखेड येथील साई मंगल कार्यालयात 29 ऑगस्ट रोजी झालेल्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याप्रकरणी तिचा पती, सासू, सासरे, दीर, मुलीचे वडील, आई या व्यक्तींवर बालविवाह केल्याप्रकरणी कलम 376, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाई अल्पसंख्यांक आघाडीचे जामखेड तालुकाध्यक्ष आदिल शेख यांनी केली आहे. सदर व्यक्तींवर गुन्हे दाखल न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *