अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची व मातंग समाजाच्या आरक्षणाची वर्गवारी करण्याची मागणी
राज्य सरकारला तीव्र आंदोलनाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- लहुजी शक्ती सेनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंतीनिमित्त सिद्धार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची व मातंग समाजाला अ, ब, क, ड नुसार आरक्षणाची वर्गवारी करण्याच्या मागणी करुन राज्य सरकारला तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी विजय पठारे, महिला जिल्हाध्यक्षा अनिता नेटके, पाथर्डी तालुकाध्यक्ष सिताराम शिरसाठ, जयवंतराव गायकवाड, किरणभाऊ कनगरे, संजय सकट, लखन डाडर, संतोष उमाप, राजाराम काळे, ज्ञानेश्वर डाडर आदी उपस्थित होते.
सुनिल शिंदे म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात अग्रगण्य कार्य केले आहे. दीन, दलित व दुर्बल घटकांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या कार्याचा सन्मान हा भारतरत्न पुरस्काराने होण्याची सर्व समाजाची अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लहूजी शक्ती सेनेच्या माध्यमातून राज्य सरकारडे वारंवार मागणी करुन बार्टीच्या धर्तीवर आर्टीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची व मातंग समाजाला अ, ब, क, ड नुसार आरक्षणाची वर्गवारी करण्याची महत्त्वाची मागणी प्रलंबीत असून, राज्य सरकारने या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी हा विषय निकाली न काढल्यास त्यांची किंमत पुढील निवडणुकीत त्यांना मोजावी लागणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.