पूर्वी ज्यांच्या सावलीने दुषित व्हायचे, त्यांच्या उद्यमशीलतेने आज समाजात क्रांती घडणार -डॉ. प्रशांत नारनवरे
युवा उद्योजकांचा गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- पिढ्यानपिढ्या गुलामगिरीत वाढलेल्या समाजाला संधी मिळाल्याने प्रगती झाली. काही मोजक्यांची झालेली प्रगती ही संपुर्ण समाजाची प्रगती म्हणता येणार नाही. समाजाच्या प्रगतीसाठी कोणी दुसरा येणार नसून, पुढे गेलेल्या समाजबांधवांनी मागासलेल्यांना हात देण्याची गरज आहे. पूर्वी ज्यांच्या सावलीने दुषित व्हायचे, त्यांच्या उद्यमशीलतेने आज समाजात क्रांती घडणार असल्याची अपेक्षा समाज कल्याणचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी व्यक्त केली.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉ. बाबासाहेब संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे आणि रविदासीया चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित युवा उद्योग व्यवसाय शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात नारनवरे बोलत होते. यावेळी बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त रामकिसन देवढे, प्रदेश सचिव सुभाष चिंधे, बार्टीचे विभाग प्रमुख उमेश सोनवणे, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे दत्तात्रय बोरुडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुढे नारनवरे म्हणाले की, ज्या क्षेत्रात काम करायचे त्या क्षेत्रात सर्वगुण संपन्न व्हावे लागेल. गुण व प्रावीण्य मिळवण्यासाठी मुलांना चांगले शिक्षण देण्याची गरज आहे. बदलत्या जगावर अधिराज्य गाजविण्यासाठी शिक्षणासाठी व उद्योगधंद्यासाठी युवक सातासमुद्रापार गेला पाहिजे. शिक्षणाने मनुष्य घडत असला तरी, त्या शिक्षणाला ध्येय व उद्दीष्टाची जोड असावी. पारंपरिक व्यवसायात न गुंतता नवनवीन उद्योगधंदे उभारण्याचे त्यांनी आवाहन केले.
महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सविता सकटे यांनी शाहिरीच्या माध्यमातून क्रांती गीत सादर केले. बार्टीचे समतादूत यांनी पथनाट्यातून शैक्षणिक योजनांची माहिती दिली. प्रास्ताविकात संजय खामकर यांनी चर्मकार विकास संघ स्थापन करून महाराष्ट्रातील एक लाख सदस्य जोडून शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम सुरु आहे. समाजातील युवकांना उद्योजक म्हणून पुढे आनण्यासाठी रविदासीया चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीची स्थापना करण्यात आली. समाजातील नवउद्योजकांना प्रेरणा मिळण्यासाठी या शिबीर व गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये म्हणाले की, जगाची अर्थव्यवस्था झपाट्याने बदलत असून, पारंपारिक व्यवसायात खितपत पडण्यापेक्षा बदल घडविणे अपेक्षित आहे. शासनाच्या अनेक योजना असून ते शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्याची गरज आहे. शासनाच्या योजना, बजेट आणि लाभार्थी यामधील दरी दूर करण्यासाठी बार्टी कार्यरत आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या आर्थिक उत्थानासाठी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत बार्टी कार्यरत आहे. समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन देऊन वाईट परंपरा दूर करण्यासाठी जनजागृतीचे देखील कार्य केले जात आहे. प्रबोधनाशिवाय वैचारिक भूक भागू शकत नसल्याचे सांगून, चर्मकार चर्मकार विकास संघाचे काम पाहून मोठा विश्वास निर्माण झाल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
समाजातील युवा उद्योजकांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा व्यवस्थापक (उमेद) सोमनाथ जगताप, प्रकल्प अधिकारी (एम.सी.ई.डी.) तात्यासाहेब जिवडे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद, समाज कल्याणचे संदीप फुंदे, समशेर तडवी, अतुल दावंगे यांनी उपस्थित युवक व बचत गटाच्या महिलांना शासनाच्या विविध योजना, उद्योग, व्यवसाय, प्रशिक्षण व स्पर्धा परीक्षा सविस्तर मार्गदर्शन केले. पाहुण्याचे स्वागत सुभाष मराठे, राजेश उंबरकर, संदिप सोनवणे व प्रितम देसाई यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कानडे यांनी केले. आभार सुभाष मराठे यांनी मानले. या उपक्रमासाठी चर्मकार विकास संघ व लोकनेते माजी आमदार सीताराम घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांचे विशेष सहकार्य लाभले.