जनशिक्षण संस्थेत जागतिक युवा कौशल्य दिन साजरा
शाश्वत विकासासाठी कौशल्यक्षम शिक्षण काळाची गरज -बाळासाहेब पवार
अहमदनगर (प्रतिनिधी)- शाश्वत विकासासाठी कौशल्यक्षम शिक्षण काळाची गरज आहे. यामुळे सुशिक्षित बेरोजगारीच्या प्रश्नावर मात करता येणार आहे. केंद्र सरकार स्किल इंडिया उपक्रम राबवत असून, त्यामुळे अनेक युवकांना स्वयंरोजगार मिळाला आहे. युवक व महिलांनी कौशल्यक्षम प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जनशिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार यांनी केले.
महिलांना स्वयंरोजगारासाठी विविध प्रशिक्षण देणार्या जनशिक्षण संस्थेत जागतिक युवा कौशल्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते. यावेळी जनशिक्षण संस्थेचे कार्यक्रम सल्लागार समिती सदस्य कमल पवार, कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कुंदा शिंदे, अनिल तांदळे, माधुरी घाटविसावे, मंगल चौधरी आदींसह प्रशिक्षिका व प्रशिक्षणार्थी महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कमल पवार म्हणाल्या की, महिलांनी पारंपारिक ब्युटी पार्लर, शिवणकाम प्रशिक्षणाबरोबर उद्योगशील प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन आदी प्रशिक्षण घेऊन स्वतःचा विकास करण्याची गरज आहे. कौशल्य विकसित केल्यास आत्मनिर्भर होता येणार आहे. लवकरच महिलांसाठी खास घरगुती उपकरनांच्या दुरुस्तीसाठी (मिक्सर, इस्त्री, गॅस, शेगडी इत्यादी दुरुस्ती) कोर्स सुरु केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जनशिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालय असलेल्या नालेगाव, दातरंगे मळा परिसरात रॅली काढण्यात आली. यामध्ये महिला व युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सस्थेच्या कार्यालयात महिलांना घरगुती विद्युत उपकरणे दुरुस्तीचे दत्तात्रय नजान यांनी प्रशिक्षण दिले. तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण महिला व युवतीमध्ये रुजविण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठच्या (नवी दिल्ली) विस्तारीत केंद्र जन शिक्षण संस्थेत सुरु करण्यात आले असून, या केंद्राच्या फलकाचे अनावरण व्यवस्थापकीय कमिटी सदस्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदा शिंदे यांनी केले. आभार शफाकत सय्यद यांनी मानले.