• Wed. Dec 11th, 2024

राष्ट्रीय पिछडावर्ग ओबीसी मोर्चाचे केंद्र सरकार विरोधात धरणे

ByMirror

May 25, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय पिछडावर्ग ओबीसी मोर्चाच्या वतीने भारत बंदच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (दि.25 मे) जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्रातील भाजपच्या सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात डॉ. भास्कर रणनवरे, बहुजन मुक्ती पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले, गणेश चव्हाण, अशोक साळवे, राजू शेख, अनिल चोटीलेश, गणपत मोरे, सुनिल ठाकरे, दयाराम सावंत, रामदास धनवडे, रमेश मकासरे, मिलिंद काळपुंड आदी सहभागी झाले होते.


राष्ट्रीय पिछडावर्ग ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास पटेल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भारतभर झालेल्या या आंदोलनात राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. यावेळी जबरदस्तीने करण्यात येणारे कोरोना लसीकरण, एनआरसी, सीएए व एनपीआर कायदा, पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली आदिवासींना जल, जंगल व जमीन यापासून विस्थापित करणे व टाळेबंदीत कामगारांच्या विरोधात बनवलेल्या श्रमिक कायद्याला विरोध दर्शविण्यात आला.


केंद्र सरकारद्वारे इतर मागासवर्ग ओबीसीची जातिनिहाय जनगणना करावी, ईव्हीएम मशीन बंद करून सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या, खाजगी क्षेत्रामध्ये एस.सी., एस.टी. ओबीसींना आरक्षण लागू करावे, एमएसपी गॅरंटी कायदा करून शेतकर्‍यांना न्याय द्यावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी, मध्यप्रदेश, ओडीसा, आणि झारखंडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र मतदारसंघ लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *