कुटुंबातील सदस्याप्रमाणे ग्राहकांना स्वच्छ, निर्जंतुक व सकस आहार मिळावा -प्रा. माणिक विधाते
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रत्येकाच्या घरात स्वच्छ, निर्जंतुक व सकस आहाराच्या दृष्टीने काळजी घेतली जाते. हॉटेल व खाद्य पदार्थ विक्रीचा व्यवसाय करताना देखील ग्राहक कुटुंबातील सदस्य समजून त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन स्वच्छ, निर्जंतुक व सकस आहार पुरविले पाहिजे. चांगली सेवा व दर्जा राखल्यास व्यवसायाची भरभराट होते. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने हायजिन फर्स्टची चळवळ प्रेरणादायी आहे. दत्त कृपा मिसळने हा दर्जा राखून ग्राहकांना उत्तम सेवा दिल्याने त्यांना मिळालेला हायजिन फर्स्टचे मानांकन कौतुकास्पद बाब असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी केले.
मार्केटयार्ड, सारसनगर रोड येथील दत्त कृपा मिसळ हाऊसला स्वच्छता, टापटिपपणा व निर्जंतुक आहाराबद्दल हायजिन फर्स्टचे मानांकन मर्चंट बँकेचे संचालक कमलेश भंडारी यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले. यावेळी प्रा. विधाते बोलत होते. याप्रसंगी हायजिन फर्स्टचे वैशाली मुनोत, दिपाली चुत्तर, निर्मल गांधी, वैशाली गांधी, दत्त कृपा मिसळचे संचालक मयुर विधाते, प्रा. शिवाजी विधाते, लहू कराळे आदी उपस्थित होते.
वैशाली मुनोत म्हणाल्या की, हायजिन फर्स्टने शहरात स्वच्छ, निर्जंतुक व चांगले खाद्यपदार्थ ग्राहकांना मिळण्यासाठी चळवळ उभी केली आहे. जे हॉटेल व दुकानदार या चळवळीत सहभागी होऊन ग्राहकांना स्वच्छ, निर्जंतुक, चांगले स्वच्छ खाद्य पुरवितात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मानांकन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. कमलेश भंडारी यांनी आरोग्यदायी खाद्य संस्कृती शहरात रुजविण्यासाठी हायजिन फर्स्ट योगदान देत आहे. शहरातील हातगाडी ते मोठ्या हॉटेल व्यावसायिकांना या पध्दतीने मानांकन प्रदान करण्यात आले आहे. आरोग्यासाठी स्वच्छ व निर्जंतुक खाद्य पदार्थ काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मयूर विधाते यांनी ग्राहकांना उत्तम सेवा व दर्जेदार खाद्य पदार्थ देण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले.
दत्त कृपा मिसळ हाऊसला मानांकन देण्यापुर्वी हायजिन फर्स्टच्या टिमने तब्बल दोन महिने परीक्षण केले. अनेकवेळा सूचना न देता हॉटेलची पहाणी केली. यामध्ये परिसराची स्वच्छता, स्वयंपाक गृहाची स्वच्छता, अन्न-पदार्थांचा वापर, कर्मचार्यांची वैयक्तिक स्वच्छता याने निरीक्षण करुन त्यांना मानांकन प्रदान करण्यात आले आहे. या चळवळीसाठी आय लव नगरचे विशेष सहकार्य मिळत आहे. हे मानांकन प्रदान करण्यास दिपाली चुत्तर व वैशाली मुनोत यांनी परिश्रम घेतले. यावेळी हॉटेलचे कर्मचारी राकेश थोरात, पराग थोरात, शेखर डेके यांना हायजिन फर्स्टची पिन प्रदान करण्यात आली.