शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद
अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे व वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या वतीने सोमवार दि. 14 मार्च रोजी डेक्कन थॉर्नी (निवडूंगाचे काटेरी) बुके जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठविण्यात येणार आहे. तर उन्नत शिवचेतनेचे श्रीफळ देखील त्यांना देण्यात येणार असल्याची माहिती अशोक सब्बन व अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जाहीर कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य करुन आपल्या संविधानिक पदाची इज्जत ठेवली नाही. गेल्या दोन हजार वर्षाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श शासन-प्रशासक झाला नाही. नेपोलियन बोनापार्ट, अलेक्झांडर, भारतातील सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य, अकबर या सर्वांच्या तुलनेत छत्रपती शिवाजी महाराज उजवे ठरत आहेत. सध्याच्या जगातील लोकशाही प्रणालीत छत्रपती शिवाजी महाराजांची शासन पद्धती उपयुक्त आहे. विशेषतः भारतात छत्रपती शिवाजी महाराजांची उन्नत शिवचेतना व डिच्चू कावा तंत्र फारच उपयुक्त असल्याचे संघटनेच्या वतीने म्हंटले आहे.
राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन ते उन्नत शिवचेतनेपासून लांब असल्याचे जनतेच्या लक्षात आणून दिले आहे. त्यामुळे राज्यपालांकडून आनखी काही गंभीर बाबी घडू नये, यासाठी त्यांच्या विरोधात संघटनेने डिच्चू कावा जारी केला आहे. याचा भाग म्हणून त्यांना डेक्कन थॉर्नी (निवडूंगाचे काटेरी) बुके पाठविण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी अॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, यमनाजी म्हस्के, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, हिराबाई ग्यानप्पा, अॅड. गवळी, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.