नगर क्लब निवडणुक
नगर क्लबचा विकास हेच प्रगती पॅनलचे ध्येय व उद्दिष्ट -डॉ. पांडुरंग डौले
अहमदनगर (प्रतिनिधी)- भुईकोट किल्ला येथील नगर क्लबची येत्या रविवारी (दि.26 जून) निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.22 जून) सकाळी नगर क्लब येथे प्रगती पॅनलच्या वतीने क्लबचे सभासद मतदारांसाठी स्नेहभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. पांडुरंग डौले यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनल निवडणुकीला सामोरे जात आहे. डौले हे सचिव पदासाठी तर कार्यकारणी सदस्यपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेले निलेश चोपडा, ईश्वर बोरा, अभिमन्यू नय्यर, योगेश मालपाणी, विकी मुथा, संजय ताथेड, राहुल काठेड, डॉ. रंगनाथ सांगळे या आठही उमेदवारांनी क्लबचे सभासद मतदारांना क्लबच्या सर्वांगीन विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.
डॉ. पांडुरंग डौले म्हणाले की, नगर क्लबची लीज 31 मार्च 2024 मध्ये संपणार आहे. पॅनलचे उमेदवार सभासद या लीजचे नूतनीकरण करुन मुदत वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे सदर्न कमांड ते डिफेन्स मिनिस्ट्री दिल्लीपर्यंत पाठपुरावा सुरू करण्यात आलेला आहे. ही प्रक्रिया निश्चितच पूर्ण होणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले तसेच प्रगती पॅनलच्या माध्यमातून नगर क्लबचा विकास हेच ध्येय, उद्दिष्ट समोर ठेवून निवडणुकीला सामोरे जात आहोत. सभासदांचे आरोग्य उत्तम राहावे व विविध खेळांना प्रोत्साहन मिळून अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या प्रमुख उद्दिष्ट प्रगती पॅनलच्या उमेदवारांचा राहणार आहे. सभासद मतदारांनी प्रगती पॅनलच्या उमेदवारांना मतदान करण्याचे त्यांनी आवाहन केले.
ईश्वर बोरा म्हणाले की, क्लबचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी व 2024 मध्ये संपणार्या लीजचा प्रश्न प्रगती पॅनलच्या माध्यमातून सोडविण्यात येणार आहे. सन 2013 पासून क्लबमध्ये वेगवेगळ्या सुधारणा करण्यात आल्या. क्लबचा प्रत्येक सभासदाला अभिमान वाटावा या भावनेने प्रगती पॅनल योगदान देणार आहे. क्लबचे अत्याधुनिकीकरण व सभासदांना हायटेक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अभिमन्यू नय्यर यांनी सभासदांनी विकासाला साथ देऊन, युवकांना नव्या उमेदीने काम करण्याची संधी द्यावी. क्लबचा कायापालट करताना एक विकासात्मक रूप देण्याचे काम केले जाणार असल्याचे सांगितले. उपस्थित प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांनी नगर क्लबचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. या स्नेहभेट कार्यक्रमासाठी शहरातील विविध क्षेत्रातील क्लबचे प्रतिष्ठित सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.