उत्तर महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या राज्यस्तरीय परिषदेत आयकर, जीएसटीच्या नवनवीन तरतुदीवर चर्चा
अहमदनगर(प्रतिनिधी)- कर सल्लागारांनी कायदा, घटनेचा अभ्यास करून त्याच्या अधीन राहून काम करावे. बदलत्या आव्हानांनुसार टॅक्स कन्सल्टंट पुरते मर्यादीत न राहता, बिझनेस कन्सल्टंट होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य विक्रीकर न्यायाधिकरणाचे सदस्य सुमेरकुमार काले यांनी केले.
उत्तर महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या पुढाकाराने नाशिक, पुणे, मुंबई येथील कर सल्लागारांच्या संघटनांच्या वतीने टॅक्स का कुंभमेला ही राज्यस्तरीय दोन दिवसीय परिषद नाशिक येथे पार पडली. यामध्ये पहिल्यांदा अहमदनगर टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनला सक्रीय सहभागी करुन घेण्यात आले होते.
या परिषदेत अहमदनगर असोसिएशनचा सहभाग होण्यासाठी असोसिएशनचे उपाध्यक्ष, एनएमटीपीए चे सचिव आणि नाशिक समिती सदस्य नितीन डोंगरे यांनी पुढाकार घेतला होता. अहमदनगर असोसिएशनचे अध्यक्ष किशोर गांधी, सचिव प्रसाद किंबहुने या परिषदेच्या कार्यकारी समितीमध्ये होते. नगरचे अॅड. पुरुषोत्तम रोहीडा, सुनील फळे, सुनील कराळे, सोहम बरमेचा, आशिष मुथा, अॅड. निलेश चोरबेले, करण गांधी, अमित पितळे, अंबादास गाजूल, सुनील सरोदे आदी उपस्थित होते. असोसिएशनचे सदस्य आनंद लहामगे यांनी परिषदेच्या समारोपाला हजेरी लावली होती.
परिषदेच्या समारोपीय भाषणात काले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कायदेशीर मार्गाने व्यापाराचा योग्य कर भरण्यासाठी आपला प्रयत्न हवा. व्यापारी, उद्योग जगाचा योग्य अभ्यास करून तो नेमके काय काम करतो?, या साठी वर्षातून एकदा फिल्ड व्हिजीट करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
उपस्थित वक्त्यांनी टॅक्स डिपार्टमेंटकडे अद्यावत संगणकीय तंत्रज्ञानामुळे तुमच्या सर्व व्यवहाराची माहिती त्यांच्याकडे आधीच असते. त्यामुळे काळजीपुर्वक काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. परिषदेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल सर्व संस्थाच्या वतीने मुख्य आयोजक अनिल चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. या परिषदेत सीए विशाल पोद्दार, श्रीपाद बेदरकर, उमेश शर्मा, अॅड. विनायक पाटकर, अॅड. दिपक बापट यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन जीएसटी कायद्यातील नवनवीन तरतुदी, आयकर, आयकर कायद्यातील फेसलेस असेसमेंट या विषयांची माहिती दिली. नीता डोंगरे यांनी अद्यावत ज्ञान मिळवण्यासाठी अशा परिषदांची गरज असून, यामध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याची अपेक्षा व्यक्त केली.