सावता महाराजांचे कार्य महान -आकाश महाराज फुले
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील संत सावता महाराज मंदिरात संतश्रेष्ठ शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त समता परिषद, माळी समाज व ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून, मंदिर परिसरात सडा-रांगोळ्या टाकून आकर्षक सजावट केली होती.
संत सावता महाराजांच्या मूर्तीस अभिषेक पुंड यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रामदास फुले व भाऊसाहेब पुंड यांच्या हस्ते संत सावता महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आरती करण्यात आली. ग्रामस्थांनी कांदा, मुळा, भाजी, भाकरीचा नैवेद्य दाखवून दर्शन घेतले. भाविकांमध्ये प्रसादाचे वाटप करण्यात आले.
रात्री नेप्ती भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम रंगला होता. युवा कीर्तनकार तथा शिवव्याख्याते आकाश महाराज फुले प्रवचनात म्हणाले की, कांदा, मुळ्याची शेती फुलवून खरा भक्ती मार्ग दाखविणारे संत सावता महाराजांचे कार्य महान आहे. त्यांनी जीवनात कर्माला महत्व दिले. पंढरपूरला ते गेले नाहीत, मात्र त्यांच्या भक्तीने साक्षात पांडुरंग त्यांना भेटवयास आले. कर्तव्य, कर्म करीत राहणे ही एक प्रकारे ईश्वर सेवा असल्याचा त्यांचा संदेश आजही दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच जालिंदर शिंदे, माजी सरपंच अंबादास पुंड, समता परिषदेचे शाखा अध्यक्ष शाहूराजे होले, भानुदास फुले, संतोष बेल्हेकर, प्रा. एकनाथ होले, मिलिंद होले, राजू फुले, सुरेश कदम, सार्थक होले, सिद्धार्थ शिंदे, महादेव चौरे, शेखर होले, तुकाराम चौरे, नितीन शिंदे, रमेश रावळे, अशोक शेरकर, वसंत कदम, पाराजी चौरे, विमल शिंदे, शकुंतला फुले, रोहिणी पुंड, जमुना पुंड, कमल चौरे, सुमन चौरे आदींसह महिला व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.