निमगाव वाघा ते नेप्ती रस्त्याच्या दुतर्फा लावली जाणार 1 हजार झाडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी पावसाळ्यात लागवड करण्यात येणार्या झाडांसाठी निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायत हद्दीत खड्डे खोदण्याच्या कामाचे प्रारंभ डॉ. विजय जाधव व ग्रामपंचायत सदस्य तथा वृक्षमित्र पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गणेश येणारे, संतोष रोहोकले, वनरक्षक अफसर पठाण आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धन चळवळ व्यापक होण्याची गरज आहे. झाडे लावण्याबरोबर ती जगवणे देखील महत्त्वाचे आहे. झाडांची कत्तल झाल्याने नैसर्गिक संकटे ओढावली असून, धरणी मातेला हिरवाईचे पुनर्वैभव प्राप्त करुन देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अहमदनगर अंतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी दरवर्षी विविध ठिकाणी झाडे लावली जातात. यावर्षी निमगाव वाघा ते नेप्ती रस्त्याच्या दुतर्फा या पावसाळ्यात एक हजार झाडांची लागवड केली जाणार आहे. ही झाडे लावण्यासाठी रस्ता दुतर्फा खड्डे खोदण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. वनक्षेत्रपाल दिलीप जिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अफसर पठाण हे रस्ता दुतर्फा वृक्षलागवडीचे काम पाहणार आहेत.