• Wed. Dec 11th, 2024

गुंडेगाव सेवा सोसायटीत बाळासाहेब हराळ गटाचे निर्विवाद वर्चस्व

ByMirror

May 16, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था एकच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेते व जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांच्या यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ शेतकरी पॅनलने शिवाजी कर्डिले प्रणित रामेश्‍वर शेतकरी पॅनलचा 13-0 ने धुव्वा उडवत एकहाती वर्चस्व राखले.
गुंडेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या कार्यकारी मंडळाची दि.15 मे रोजी निवडणुक झाली. सेवा संस्थेच्या निवडणुकीत बाळासाहेब हराळ यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ शेतकरी पॅनलचे माजी सरपंच संजय कोतकर, मा. उपसरपंच सुनिल भापकर, मा. सरपंच नयना भापकर, मा. सरपंच उषा जाधव, मा. चेअरमन वामनराव जाधव, पंडीतराव हराळ, पोपट भापकर, अंकुश कुताळ, संदिप जाधव, रमेश चौधरी, रावसाहेब हराळ, अंबादास जाधव, छाया माने यांनी गुंडेगावात केलेल्या ग्रामविकासाच्या बळावर मतदान मागत विरोधी गटाचे मनसुबे उधळून लावले. पराभूत रामेश्‍वर पॅनलचे बबन हराळ, नानासाहेब हराळ, उपसरपंच संतोष भापकर, संतोष धावडे यांनी नेतृत्व केले.

गुंडेगावात मागील तीन पंचवार्षिक दोनही सोसायट्या बीनविरोध होत्या. पण जिल्हा बँक ठरावाच्या वेळी उमेदवारांची झालेली गुजरातवारी आणि त्यामुळे निर्माण झालेली अस्वस्थतेमुळे या वर्षीची निवडणूक लक्षवेधी ठरली. नगर तालुक्यात कर्डिले गटाला सोसायट्या ताब्यात मिळत असताना गुंडेगावात चित्र वेगळे दिसले. बाहेरील व्यक्तींचा गावच्या कारभारात वाढलेला हस्तक्षेप सर्वसामान्य जनतेला न रुचल्याचे मतदानातून दिसून आले. सेवा सोसायटी दोनची निवडणूक प्रक्रिया चालू असून निकाल काय लागतो ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

भैरवनाथ शेतकरी पॅनेलचे विजयी उमेदवार- भाऊसाहेब कोतकर, वामनराव जाधव, रावसाहेब कोतकर, आंबादास धावडे, अ‍ॅड. चंद्रकांत निकम, पंडीत भापकर, प्रा. धन्यकुमार हराळ, शंकर हराळ, कुताळ सचिन, अशोक पवार, मंगल कोतकर, छाया भापकर, गोपाळराव बैरागी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *