शॉपिंग फेस्टीवलच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार मिळणार -आ.संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव, नगर-पुणे महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ भरविण्यात आलेल्या क्राफ्ट इंडिया शॉपिंग फेस्टीवलचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी नगरसेवक बाळासाहेब पवार, विनीत पाऊलबुध्दे, सुनिल त्र्यंबके, निखील वारे, मनोज कोतकर, सुरज कोतकर, विजय पठारे साई निमसे, जावेद शेख, संत पाल, मोहसीन सय्यद आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, कोरोनाच्या टाळेबंदीत अनेकांचा रोजगार बुडाला, काहींच्या नोकर्या गेल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन निर्बंध हटल्याने सर्वसामान्यांचे जीवन व आर्थिक परिस्थिती रुळावर येत आहे. शॉपिंग फेस्टीवलच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार मिळणार असून, हातावर पोट असलेल्या कारागिरांना प्रोत्साहन देखील मिळणार आहे. नगरकरांना देखील एका छताखाली राजस्थानी चप्पल पासून ते बनारसी साडी पर्यंत विविध वस्तू उपलब्ध करुन दिल्याने या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
साई निमसे यांनी क्राफ्ट इंडिया शॉपिंग फेस्टीवलच्या भव्य प्रदर्शन व विक्रीला नगरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, यामध्ये आर्टिफीशयल ज्वेलरी, लहान मुले, महिला व पुरुषांचे कपडे, राजस्थानी चप्पल, बनारसी साडी, हॅन्डलूम, विविध घरगुती साहित्य खरेदीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. मोहसीन सय्यद यांनी विविध राज्यातील नांवलौकिक वस्तू क्राफ्ट इंडिया शॉपिंग फेस्टीवलमध्ये योग्य दरात उपलब्ध असल्याने विक्रीसाठी ग्राहक वर्ग मोठी गर्दी करत आहे. या शॉपिंग फेस्टीवलला नगरकरांना भेट देण्याचे त्यांनी आवाहन केले.